कृषी विद्यापीठातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी घेतले तुरीचे विक्रमी उत्पादन - Saptahik Sandesh

कृषी विद्यापीठातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी घेतले तुरीचे विक्रमी उत्पादन

करमाळा (दि.५) : फिसरे येथील ‘कृषी योद्धा शेतकरी गट’ यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या तज्ञांनी तुरीच्या सुधारित लागवडीसाठी मार्गदर्शन केले. याचा फायदा होऊन शेतकरी बांधवांनी यंदा तुरीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. 

यामध्ये फिसरे गावातील शेतकरी हनुमंत रोकडे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी विकसित ‘गोदावरी’ तुरीच्या वाणामुळे विक्रमी 19.50 क्विंटल प्रति एकर उत्पादन घेतले आहे.

दि. 13 डिसेंबर 2024 रोजी कुलगुरू प्रा. इन्द्र मणि यांनी शेतकरी गटास भेट दिली. यावेळी शेतकरी गटाने आपल्या यशाची कथा सांगताना म्हटले की, “पूर्वी तुरीचे उत्पादन फक्त 3-4 क्विंटल प्रति एकर मिळायचे. मात्र, विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन आणि पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आता प्रति एकर 15 क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन मिळवत आहोत.” शेतकरी गटाने यशस्वी पीक उत्पादनाबद्दल शास्त्रज्ञांचे आभार मानले व भविष्यातही असेच मार्गदर्शन मिळावे, अशी विनंती केली.

श्री. हनुमंत रोकडे यांचे यश संपूर्ण तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे आणि यामुळे आधुनिक शेतीत मार्गदर्शन व योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेता येऊ शकते, हे सिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!