“कृषी संजीवनी सप्ताह” मोहीम अंतर्गत ‘पौष्टिक तृणधान्य’चे आहारातील महत्त्व या विषयावर मार्गदर्शन संपन्न..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : गोरेवाडी येथे मंडळ कृषि अधिकारी केत्तूर,तालुका कृषी अधिकारी, करमाळा यांचे मार्फत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने “कृषी संजीवनी सप्ताह” मोहीम अंतर्गत पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्त्व उपस्थित शेतकरी बांधवांना उमाकांत जाधव, कृषी पर्यवेक्षक यांनी मार्गदर्शन केले.
याबाबत बोलताना त्यांनी सांगितले कि, भारतीय आधुुनिक कृषी क्षेत्रात स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे अमूल्य योगदान आहे. स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती “कृषी दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन 1989 मध्ये शासनाने घोषित केला. तेव्हापासून 1 जुलैला शासकीय स्तरावर सर्व कार्यालयात कृषीदिन साजरा होत आहे. याच दिवसाच्या औचित्य साधून कृषी विभाग हा आठवडा कृषी संजीवनी सप्ताह म्हणून साजरा करत आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा पौष्टिक तृणधान्य उत्पादक देश आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 उपक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी ही कृषी विभाग आणि शेतकरी बांधव यांच्या खांद्यावर आहे. आपण सर्वांनी मिळून या उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आणि पौष्टिक तृणधान्य पिकांची लागवड वाढवावी तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याकडे लक्ष द्यावे. यामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत विविध पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या प्रकल्पासाठी 35 टक्के अनुदान दिले जाते. तसेच ज्वारी पासून ज्वारी दोसा, ज्वारीच्या शेवया इत्यादी पदार्थ तयार केले जातात. ज्वारीमध्ये खनिजे, तंतुमय पदार्थ असल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. हृदयाचे आजार, रक्तदाब नियंत्रित राहतो. ज्वारी मधील स्टार्च चे विघटन हळूहळू होत असल्यामुळे ज्वारी आरोग्यास उत्तम आहे. ज्वारीमुळे बद्धकोष्ठता समस्या दूर होते.
महाराष्ट्र मध्ये खरीप हंगामामध्ये घेतले जाणारे पौष्टिक तृण धान्यामधील महत्त्वाचे पीक म्हणजे बाजरी. बाजरी चे क्षेत्र हळूहळू कमी होत चालले आहे ते आपल्याला वाढवायचे आहे. बाजरी मध्ये सर्वात जास्त ऊर्जा असते. थंडीच्या दिवसांमध्ये बाजरीचा आहार पौष्टिक असतो. अशक्त व वृद्ध व्यक्तींना बाजरी वरदान आहे. सल्फरयुक्त अमिनो ऍसिड असल्यामुळे लहान मुलं व गर्भवती मातांसाठी बाजरी अतिशय उपयुक्त आहे. महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी बाजरीचा उपयोग होतो. बाजरी पासून बाजरीची खिचडी, बाजरीचा पॅटीस इत्यादी पदार्थ बनवता येतात. यानंतर पौष्टिक तृणधान्य धान्यामध्ये नाचणी हे पीक येते. नाचणी नैसर्गिक जंतुनाशक साखरेवर नियंत्रण आणण्यासाठी उपयुक्त आहे. नाचणी मुळे जखम लवकर भरते.
नाचणी आम्लपित्त कमी करून रक्त शुद्ध करते. शारीरिक उत्साह वाढवण्यासाठी व कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी नाचणी आरोग्यामध्ये असणे आवश्यक आहे. कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे हाडे बळकट होतात. तसेच अपचन कमी होते. केस व त्वचा चमकदार होते. असेही त्यांनी सांगितले. नाचणीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस जास्त असल्यामुळे बाळाच्या सुदृढ वाढीसाठी नाचणीचा उपयोग होतो. यांनतर राजगीरा, भगर, राळा, कोदो, कुटकी या पौष्टिक तृणधान्य आदी विषयी उमाकांत जाधव यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना, बीजप्रक्रिया,mahadbt अर्ज भरणे , अनुसूचित जाती जमाती अर्ज संख्या वाढवणे, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत शेततळे,जमीन आरोग्य पत्रिका, पी एम किसान सन्मान निधी योजना इ केवायसी आणि आधार शेडिंग याविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला श्रीरंग मल्हारी देवकाते, मोहन तुकाराम पांढरे, अक्षय शिवाजी पारखे, प्रकाश दादासाहेब कारंडे, आप्पासाहेब गोरे ,काशिनाथ गोरे, बाळासाहेब भांडवलकर इत्यादी शेतकरी बंधू उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेजस देमुंडे आणि सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.