दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण – निंभोरेत सरपंचांचा अनोखा उपक्रम

केम (संजय जाधव): निंभोरे गावात स्वातंत्र्यदिनानिमित्त सरपंच रविंद्र वळेकर यांनी स्वतः ध्वजारोहणाचा मान न घेता इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनी दिव्या परमेश्वर मारकड हिच्या हस्ते ध्वजारोहण करून आदर्श उपक्रम राबवला. गावकऱ्यांनी या निर्णयाचे कौतुक करत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरल्याचे मत व्यक्त केले.

यापूर्वी सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री छत्रपती संभाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून ‘जय जवान जय किसान’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा देत देशभक्तीचे वातावरण निर्माण केले. ध्वजारोहणानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या प्रतिमेचे पूजन व ‘पसायदान’ कार्यक्रम घेण्यात आला.


या प्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार गावातील अंगणवाडी सेविका सुनिता चंद्रकांत वळेकर व उमेद अभियानाच्या सीआरपी सुषमा रामा वाघमारे यांना प्रदान करण्यात आला. वळेकर यांनी ‘लाडकी बहीण’ व ‘लेक लाडकी’ योजनेत काम केले असून वाघमारे यांनी महिलांच्या बचतगटांना सक्षम करण्यासाठी योगदान दिले आहे.



