“एकजूट आणि कष्ट हाच संकटांवर मात करण्याचा मार्ग”- मनोज जरांगे-पाटील

करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा,ता.२ : सध्याच्या सामाजिक जीवनात प्रत्येक स्तरावर अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. आर्थिक अडचणी, सामाजिक विसंवाद, बेरोजगारी आणि व्यसनाधीनता यांसारख्या समस्यांनी समाजासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी एकजुटीने आणि परस्पर सहकार्याच्या भावनेने वाटचाल करणे काळाची गरज आहे, असे प्रभावी प्रतिपादन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले.

शहीद जवान नवनाथ गात यांच्या २३व्या स्मृतीदिनानिमित्त वरकुटे (ता. करमाळा) येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड.डाॅ. बाबुराव हिरडे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नारायण आबा पाटील, तहसीलदार शिल्पा ठोकडे, यश कल्याणी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य रश्मी बागल- कोलते, आण्णासाहेब ढाणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.आपल्या भाषणात पुढे बोलताना श्री. जरांगे पाटील म्हणाले की, “आज समाजात अनेक गरजवंत लोक आहेत; मात्र त्यांच्या मदतीसाठी पुढे येणारे हात कमी पडताना दिसतात. प्रत्येकाने ‘मी समाजासाठी काय करू शकतो?’ हा विचार केला पाहिजे. युवकांनी कष्टाची तयारी ठेवली पाहिजे. व्यसनांच्या आहारी जाऊन भविष्य घालविण्यापेक्षा कष्टातून स्वतःचे आणि कुटुंबाचे भविष्य उभे करणे गरजेचे आहे. कष्ट आणि एकजूट यांच्या बळावरच भविष्यातील संकटांवर मात करता येईल.”
गेल्या २३ वर्षांपासून शहीद जवान नवनाथ गात यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याबद्दल त्यांनी स्मारक समिती व ग्रामस्थांचे विशेष कौतुक केले. “एखाद्या शहीदाच्या स्मृती जपणे म्हणजे केवळ कार्यक्रम करणे नव्हे, तर त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन समाजहिताचे कार्य करणे होय,” असेही ते म्हणाले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.यामध्ये उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे,शौर्य पुरस्कार सांगोला येथील रावसाहेब साळुंके, आदर्श शाळेचा पुरस्कार आदलिंग वस्ती शाळा कोंढेज,क्रिडा पुरस्कार शिवम अण्णासाहेब ढाणे व प्रा. डॉ. संदीप ओहोळ यांचा समावेश आहे.
यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ८५ जणांनी रक्तदान केले आहे.रक्तसंकलनाचे कार्य रामाबाई शहा रक्तपेढी (बार्शी) व कमला भावनी रक्तपेढी (करमाळा) यांच्या वतीने करण्यात आले. अनेक युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून शहीदाला मानवंदना अर्पण केली.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीतांनी देशभक्तिपूर्ण वातावरणात करण्यात आली. स्मारकाचे पूजन ॲड. हिरडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले, तर ध्वजारोहण तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते पार पडले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रश्मी बागल व भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या हस्ते झाले.
तसेच अध्यक्षीय भाषणात ॲड. हिरडे यांनी शहीद जवानाच्या कुटुंबाच्या त्यागाची आठवण करून दिली व समाजाने अशा कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन केले. आमदार नारायण पाटील यांनीही आपल्या मनोगतात शहीद जवानांच्या स्मृती जपण्याची ही परंपरा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. गणेश करे पाटील यांनी सामाजिक ऐक्याची गरज अधोरेखित केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहीद जवान नवनाथ गात स्मारक समिती, शहीद जवान नवनाथ गात मित्र मंडळ व वरकुटे ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गाडेकर यांनी प्रभावीपणे केले. प्रस्ताविक नीलकंठ ताकमोगे यांनी कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला, तर उपस्थितांचे आभार सचिन गात , नागनाथ गात यांनी मानले.
शहीद जवान नवनाथ गात यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून समाजात एकजूट, कष्ट, त्याग आणि देशप्रेमाचा संदेश देण्यात आला. उपस्थित ग्रामस्थ व युवकांसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.



