करमाळा अर्बन बँकेच्या ठेवीदारांचे लक्ष ५ फेब्रुवारीच्या मिटिंगकडे


करमाळा (संदेश प्रतिनिधी)  :  करमाळा अर्बन बँकेच्या ठेवीदारांना बँकेतील ठेवीचे पैसे देण्यास बँक विरोध करत असल्याने बँकेविरोधात ठेवीदारांनी २६ जानेवारीला बँकेसमोर उपोषण करण्याचा ईशारा दिला होता. यानंतर करमाळा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी करमाळा अर्बन बँकेचे प्रशासक, पदाधिकारी व ठेवीदार यांच्यामध्ये मीटिंग घेतली होती. या मीटिंग नंतर २६ जानेवारीचे उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. पुढील मीटिंग ५ फेब्रुवारीला होणार आहे त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे ठेवीदारांचे लक्ष ५ फेब्रुवारीच्या मिटिंगकडे लागलेले आहे.

आरबीआयने करमाळा अर्बन बँकेवर २९ जानेवारी पर्यंत आर्थिक निर्बंध लावलेले आहेत.बँकेकडून आरबीआयला आर्थिक निर्बंध उठवण्या संदर्भात पत्र पाठवलेले आहे.
२९ जानेवारी नंतर जर आरबीआयने आर्थिक निर्बंध उठविले नाही तर ठेवीदारांचे पैसे कसे द्यायचे यावर करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या अध्यक्षतेखाली ५ फेब्रुवारीला परत बँकेचे प्रशासक, चेअरमन व ठेवीदार यांची बैठक घेतली जाणार आहे. यात समाधानकारक तोडगा निघाला नाहीतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.

करमाळा अर्बन बँक आर्थिक अडचणीत आल्याने आरबीआयने करमाळा अर्बन बँकेवर आर्थिक निर्बंध लावले आहेत. यामुळे ठेवीदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मेहनतीने कमावलेली रक्कम बँकेत सुरक्षित ठेवून भविष्यात वापरता यावी या उद्देशाने बँकेत ठेवलेल्या स्वतःच्या हक्काच्या पैशासाठी ठेवीदारांना हेलपाटे मारावे लागत आहेत. बँकेच्या प्रशासनाकडून, कर्मचाऱ्यांकडून ठेवीदारांना उद्धटपणे उत्तरे दिली जात असल्याने ठेवीदारांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. तातडीच्या, दवाखान्याच्या खर्चासाठी, घरगुती खर्चासाठी लागणाऱ्या रकमेसाठी बँकेकडून पुढची मुदत दिली जात आलेली आहे. ठेवीदारांचा संयम सुटलेला असल्याने ठेवीदारांनी एकत्र येत तहसिलदार यांना निवेदन देत २६ जानेवारीला उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. नुकत्याच झालेल्या मीटिंगनंतर आता पुढील आंदोलनाची दिशा ५ फेब्रुवारीला होणाऱ्या मीटिंग मधील निर्णयावर ठरणार आहे.

संपादनसुरज हिरडे

Karmala urban Bank | Karmala | Solapur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!