जिल्ह्यात युरियाची भीषण टंचाई, शेतकरी हवालदिल -

जिल्ह्यात युरियाची भीषण टंचाई, शेतकरी हवालदिल

0

करमाळा (दि. 16): सोलापूर जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्रावर तूर, मूग, उडीद, मका, सोयाबीन यांसारख्या अल्पावधीत येणाऱ्या पिकांची लागवड झाली आहे. या सर्व पिकांना युरियाची तातडीने गरज असतानाही जिल्ह्यात युरियाची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

जिल्हा फर्टिलायझर असोसिएशनचे संचालक महेश चिवटे यांनी युरियाच्या तुटवड्याची कारणे सांगताना पुढील बाबी सांगितल्या :

वारीमुळे युरियाचा पुरवठा अडकला : आषाढी वारीमुळे पंढरपूर व कुर्डूवाडी येथे रेल्वेने येणाऱ्या युरियाचा पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर युरिया पोचलेला नाही.

पोस्ट मशीनचा गैरवापर; साठा दाखवला जात नाही

काही कृषी विक्रेत्यांनी पोस्ट मशीनवर युरियाचा साठा अद्यापही विक्री दाखवलेली नाही, त्यामुळे कृषी आयुक्तांच्या नोंदीनुसार सोलापूर जिल्ह्यात २५ ते ३० हजार टन युरिया शिल्लक असल्याचे दिसून येते. ही चुकीची माहिती दिल्यामुळे कंपन्या जिल्ह्याला पुढील पुरवठा करण्यास टाळाटाळ करत आहेत.

POS मशीनची अडचण व प्रत्यक्ष साठ्याचा अभाव

अनेक POS मशीन वारंवार बंद पडतात किंवा अपडेट होत नाहीत. शेतकरी आधार कार्डशिवाय येतात, यामुळे व्यवहार अडथळ्यांत सापडतो.
काही विक्रेत्यांना अद्याप POS मशीन मिळालेली नाहीत.यामुळे मशीनवर साठा दाखवला जातो, पण गोडाऊनमध्ये युरिया प्रत्यक्षात उपलब्ध नाही, अशी माहिती कृषी विक्रेत्यांकडून देण्यात आली आहे.

युरियाचा अनधिकृत वापरही गंभीर कारण

एक युरियाच्या पोत्याची निर्मिती सुमारे ₹२३०० खर्चाची असून, शासन यावर ₹२००० पर्यंत अनुदान देते. मात्र युरियाचा बेकायदेशीर वापर दुग्धव्यवसाय, दारू व रसायन उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
यामुळे शेतीसाठी युरियाचा तुटवडा अधिक गडद होतो आहे. केंद्र सरकारने युरियाच्या फवारणीसाठी नॅनो युरियाचे धोरण स्वीकारले आहे, पण त्यामुळे पारंपरिक युरियाचा पुरवठा अजूनच कमी झाला आहे.

बफर स्टॉक खुला करण्याची मागणी

कृषी विभागाकडे सध्या ४,००० मेट्रिक टन युरिया बफर स्टॉकमध्ये शिल्लक आहे. हा साठा तात्काळ खुला करावा, जेणेकरून बाजारातील ताणतणाव कमी होईल, अशी मागणी जिल्हा फर्टिलायझर असोसिएशनचे संचालक महेश चिवटे यांनी केली आहे.

लिक्विड युरियाची जबरदस्तीची लिंकिंग विक्री

युरिया वितरणाच्या बदल्यात कंपन्या लिक्विड युरिया व इतर न खपणारी उत्पादने कृषी विक्रेत्यांवर थोपवतात. या उत्पादकांसाठी अ‍ॅडव्हान्स रक्कम घेऊन मगच युरिया दिला जातो.
अनेक दुकानांमध्ये शंभरहून अधिक पेटी लिक्विड नॅनो युरिया साठवलेले असून ते शेतकऱ्यांकडून घेतले जात नाहीत.यामुळे लाखो रुपयांची उत्पादने दुकानांत पडून आहेत, आणि विक्रेते आर्थिक अडचणीत आले आहेत.

शेतकऱ्यांचा रोष विक्रेत्यांवर, कारवाईची मागणी

या संपूर्ण परिस्थितीमुळे कृषी विक्रेत्यांवर शेतकऱ्यांचा रोष ओढवतो आहे. विक्रेत्यांनाही युरिया मिळत नसल्याने ते अडचणीत आले असून, कृषी विभागाने उचित चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही महेश चिवटे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!