श्री कमलाभवानी देवीची उत्सव यात्रा २६ नोव्हेंबर पासून सुरु – मुख्य यात्रा ३० नोव्हेंबरला..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्याचे आराध्यदैवत श्री कमलाभवानी देवीची कार्तिक उत्सव यात्रा २६ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. रविवारी २६ नोव्हेंबर ते गुरुवारी ३० नोव्हेंबर पर्यंत दररोज दुपारी ४ ते ६ आणि रात्री ९ ते १० श्री कमलादेवीची मिरवणूक (छबिना) वेगवेगळ्या वाहनांवर निघणार आहे.
२६ नोव्हेंबर रोजी गरूड वाहनावर तर रात्री सिंह या वाहनावर मिरवणूक संपन्न होईल. २७ नोव्हेंबरला दुपारी छोट्या नंदीवर तर रात्री मोठ्या नंदीवर छबिना मिरवणूक निघणार आहे. २८ नोव्हेंबरला दुपारी काळवीट तर रात्री घोडा या वाहनावर मिरवणूक निघणार आहे. २९ नोव्हेंबरला दुपारी मोरावर तर रात्री लहान हत्तीवर छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे.
३० नोव्हेंबर रोजी मुख्य यात्रा असून, या दिवशी रात्री ११ वा. ५५ मि. सप्तमुखी घोडा, पाच वाहन आणि मोठा हत्ती अशी श्री कमलाभवानी देवीच्या उत्सवमुर्तीची मिरवणूक असणार आहे. यात्रेनिमित्त १ डिसेंबरला दुपारी तीन वाजता खंडोबा माळ येथे कुस्त्यांचा आखाडा भरणार असून यामध्ये नामवंत मल्लांची हजेरी असणार आहे. तरी कलगीतुरे, शाहीर, कलावंत मंडळी तसेच करमाळा शहर व तालुक्यातील सर्व गणेश उत्सव मंडळ, झांज पथक, आराधी मंडळींनी यात्रे दिवशी हजेरी लावून यात्रेची शोभा वाढवावी, असे आवाहन राजेरावरंभा तरुण मंडळ सलग्न श्री कमलादेवी यात्रा समितीने केले आहे.
यात्रेची सर्व तयारी केली असून, भाविकांना लाईट, पाणी, दर्शन सुलभ अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाविकांनी शांततेत यात्रा पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. – महेश वसंत सोरटे (सरपंच, श्रीदेवीचामाळ)