रिक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा तालुका – प्रांत, तहसील, डॉक्टरसह अभियंता पदे रिक्त – प्रमुख अधिकारी नसल्याने नागरिकांची गैरसोय..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यातील अनेक महत्वाची पदे रिक्त असल्याने हा तालुका रिक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जात आहे. उपविभागीय अधिकारी (प्रांत), तहसीलदार, वैद्यकिय अधिकारी, उपअभियंता, मोजणीदार असे अनेक अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होत आहे. आमदार संजयमामा शिंदे यांनी याकडे तातडीने लक्ष देवून ही पदे भरावीत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
करमाळा तालुक्यासाठी असलेले उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यांच्या जागी अद्याप कोणाचीही नेमणूक झालेली नाही. त्यामुळे जातीचे दाखले, नॉन क्रिमीलीयर दाखले, ओबीसी व इतर दाखले तसेच तुकडेजोड-तुकडेबंदी जमीन खरेदीची प्रकरणे व अन्य अनेक न्यायालयीन खटले प्रलंबीत आहेत. त्यामुळे प्रांताधिकारी यांची तातडीने नेमणूक तरी करावी किंवा त्यांचा अधिभार तरी कोणाकडे देणे गरजेचे आहे. करमाळा येथील तहसीलदार समीर माने यांची बदली झाली पण दुसरे तहसीलदार नेमले नाहीत, त्यामुळे हे पद रिक्त आहे. याशिवाय निवडणूक नायब तहसीदार पद रिक्त आहे. त्याशिवाय आठ लिपीक, दोन अव्वल कारकून, तीन मंडल अधिकारी, व २१ तलाठी पदे रिक्त आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील वाचक फौजदार हे पद रिक्त आहे. पंचायत समिती कार्यालयातील उपअभियंता-ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, उपअभियंता – जिल्हा परिषद बांधकाम विभाग, उपअभियंता लघु पाटबंधारे उपविभाग ही पदे रिक्त आहेत. त्यांचे बार्शी व पंढरपूर येथे अधिभार दिले आहेत. येथील जिल्हा उपरूग्णालयातील तीन डॉक्टर, दोन फर्मासिष्ट, १२ पैकी सहा अधिपरीचारीका ही पदे रिक्त आहेत. याशिवाय गेल्या दीड वर्षापुर्वी श्रीमती डॉ.आवळे यांची भुलतज्ञ म्हणून नेमणूक झाली, पण त्या अनधिकृतपणे गैरहजर आहेत. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील केम येथील दोन्ही डॉक्टरांची पदे, जेऊर, साडे, कोर्टी येथील दवाखान्यातील प्रत्येकी एक डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. तालुका भुमी अभिलेख कार्यालयात १८ पदे मंजूर आहेत. त्यातील १२ कर्मचारी नाहीत. मुख्यालय सहाय्यक, मोजणीदार तीन, अन्य तीन कर्मचारी व तीन शिपाई ही पदे रिक्त तर दोन कर्मचारी निलंबीत आहेत. म्हणजे येथील कारभार फक्त सहाजणावर चालतो.
यातच भर म्हणून करमाळा येथील दिवाणी न्यायालयातील न्यायाधीश सौ. मीना एखे यांना बढती मिळाली व त्या वरीष्ठ न्यायाधीश म्हणून करमाळा येथे रूजू झाल्या पण त्यांच्या जागी दुसरे न्यायाधीशाची नेमणूक झाली नाही. त्यामुळे येथे दोन न्यायालय कार्यरत होते, त्याऐवजी एकाच न्यायालयात कारभार सुरू आहे. त्यामुळे पक्षकार व वकीलांची मोठी गैरसोय होत आहे. अशा स्थितीत तालुक्यातील बहुतेक कार्यालयातील महत्वाची पदे रिक्त असल्याने कामकाजावर मोठा परिणाम झालेला आहे. नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे आमदार संजयमामा शिंदे यांनी यात लक्ष घालून अधिकारी व कर्मचान्यांची रिक्त पदे तात्काळ भरण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.