वडशिवणे ग्रामपंचायतीने दारू बंदी व अवैध धंदे बंदीचा ठराव केला मंजूर – प्रशासनाने त्वरित दखल घेण्याची केली मागणी
केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : करमाळा तालुक्यातील वडशिवणे ग्रामपंचायतीच्या वतीने तालुक्यात व आजूबाजूच्या परिसरात दारूबंदी करण्यात यावी व अवैधरित्या चालु असलेले मटका, जुगार आदी व्यवसाय बंद करावे अशा प्रकारचा ठराव केला आहे. तसेच यासंबंधीचे निवेदन वडशिवणे ग्रामपंचायतीच्या वतीने गृहराज्यमंत्री, अधीक्षक उत्पादन शुल्क खाते, जिल्हाअधिकारी,करमाळा पोलिस निरीक्षक ,पालकमंत्री सोलापूर यांना निवेदनाद्वारे कळविले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी ही आम्ही बरेच निवेदने दिली आहेत परंतु याबाबत कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. २७ मार्च रोजी सरपंच विशाल पांडुरंग जगदाळे यांनी घेतलेल्या ग्रामसभेत ‘वडशिवणे व आजूबाजूच्या परिसरात दारूबंदी करण्यात यावी व अवैधरित्या चालु असलेले मटका, जुगार आदी व्यवसाय बंद करावे’ असा ठराव पास करण्यात आला व या ठरावात म्हटले आहे की मटका व जुगार हा या गावात खुलेआम चालू आहे यामुळे वडशिवणे गावातील बऱ्याच जणांचे संसार मोडले आहेत यासंदर्भात महिलाही आक्रमक झाल्या आहेत तरीही यासंदर्भात कायमस्वरूपी कार्यवाही करावी ही विनंती ग्रामस्थांनी केली आहे .
याबाबत ग्रामपंचायतीच्यावतीने सोलापूरचे पालकमंत्री बाळासाहेब विखे-पाटील यांनाही समक्ष निवेदन देण्यात आले आहे. यासंदर्भात या निवेदनाची दखल प्रशासनाकडून घेतली नाही तर वडशिवणे ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत. या ठरावावर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या सह्या आहेत. याबरोबरच भारत अगेंस्ट कॅरप्शनचे व्हाइस चेअरमन गणेश लोंढे यांनी देखील अशा प्रकारचे निवेदन पालकमंत्री बाळासाहेब विखे-पाटील यांना दिले आहे.