लोकसभासह सर्व निवडणुकांवरती बहिष्कार टाकण्याचा वडशिवणे ग्रामस्थांचा निर्णय
केम (संजय जाधव) – ३५ वर्षापासून लोकप्रतिनिधींकडे वडशिवणे तलावात पाणी सोडण्यासाठी मागणी करून सुद्धा सर्वांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा अआरोप करत करमाळा तालुक्यातील वडशिवणे ग्रामस्थांनी येत्या लोकसभा निवडणूकीसहित इतर सर्व निवडणुकांवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून अशा निर्णयाचे निवेदन ग्रामस्थांनी करमाळ्याचे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना दिले आहे.
करमाळा तालुक्यात मांगी नंतर नंबर दोनचा मोठा तलाव वडशिवणे गावचा तलाव असून या तलावाखाली वडशिवणे, कंदर, कविटगाव व सांगवी गावातील एकूण 14 40 एकर क्षेत्र ओलिताखाली येत होते. परंतु उजनी धरणाची निर्मिती झाल्यानंतर कंदर, कविटगाव व सांगवी या गावांचा शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्यामुळे या गावांची वडशिवणे तलावातील पाण्याचे गरज संपली. परंतु वडशिवणे गाव व त्यावरील केम, मलवडी, पाथर्डी, सातोली, घोटी व साडे इत्यादी गावांना या तलावातील पाण्याची अद्यापही गरज आहे. कारण वडशिवणे गावातील हा तलाव पाण्याने भरला तर वडशिवणे सह केम पाथर्डी मलवडी सातोली घोटी या गावांना याचा लाभ होऊ शकतो. यामुळे या गावातील जवळपास 3000 हेक्टर क्षेत्र ओलिता खाली येऊ शकते .
मागील 40 वर्षापासून विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराने मग ते तालुक्यातील असोत की अन्य तालुक्यातील असोत निवडून येण्या अगोदर व निवडून आल्यानंतर फक्त आणि फक्त यांनी आश्वासन देण्यापलीकडे काहीही केलेले नाही.
गेल्या ३५ वर्षांमध्ये तालुक्याचे आमदार राहिलेल्या लोकप्रतिनिधींनी वडशिवणे तलावात कायमस्वरूपी पाणी आणण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. जोपर्यंत वडशिवणे तलावात पाणी सोडण्याचा प्रश्न मिटत नाही , तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय वडशिवणे ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबत वडशिवणे ग्रामपंचायत ने ठराव करून ग्रामस्थांच्या सहीचे निवेदन करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना देण्यात आले आहे.