चक्क इंग्लंड वरुन येवून ‘चिखलठाण’च्या वैभव गव्हाणे यांनी केले मतदान..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी चिखलठाण (ता.करमाळा) येथील वैभव गव्हाणे यांनी चक्क इंग्लंड या देशातून येवून आठ हजार किलोमीटर अंतर प्रवास करून मतदानाचा हक्क बजावला आहे.
निवडणुकीसाठी मिळालेली एक दिवसाची सुट्टी अनेक लोक मतदानाचा हक्क न बजावता कुठेतरी बाहेर फिरायला जावून घालवताना आपण पहातो. अनेक सुशिक्षित लोक सुद्धा मतदान गांभिर्याने घेत नाहीत. गावात असलेले सुद्धा अनेकजण मतदानाकडे पाठ फिरवतात. परंतु नोकरीनिमित्त इंग्लंड येथील लिड्स् शहरात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून एका खाजगी कंपनीत नोकरी करत असलेल्या वैभव नारायण गव्हाणे यांनी निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात कमी मतदान झाले त्यामुळे आपण आपल्या गावाकडे मतदानासाठी जायचे हे निश्चित केले.
श्री.गव्हाणे हे लंडन येथील आय.टी.कंपनीत नोकरी करतात, १ मे रोजी गावची यात्रा असल्याने गावाकडील मंडळींनी त्यांना यात्रेसाठी गावाकडे बोलावले परंतु सातच दिवस सुट्टी मिळत असल्याने व सात तारखेला लोकसभेचे मतदान आसल्याने मी त्याच वेळी गावाकडे येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. यानुसार शनिवारी सायंकाळी ड्युटी संपल्यानंतर रविवारी विमानाने लोकसभेचे मतदान करण्यासाठी खास भारतात आले दुसऱ्या दिवशी मुंबईवरून रेल्वेने गावाकडे येऊन त्यांनी आज गावातील प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.
आम्ही नोकरीनिमित्त परदेशात राहात असलो तरी इथल्या घडामोडींवर लक्ष असते, पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी फारच कमी झाली ही बाब मनाला काहीशी खटकली आणि आपण मतदान करण्यासाठी गावाकडे जायचं असा निर्णय घेतला, अनेक सुशिक्षित लोक मतदानाचा हक्क बजावत नाहीत व आपल्या भागात विविध सुविधा न मिळाल्यास ओरड करतात, योग्य उमेदवार निवडून यावा असे वाटत असेल तर सर्वांनी मतदान केले पाहिजे तरच हे शक्य आहे. – वैभव नारायण गव्हाणे (चिखलठाण, ता.करमाळा)
Reated News – माढा लोकसभा मतदारसंघात फलटणमध्ये सर्वात जास्त तर करमाळ्यात सर्वात कमी मतदान