वैदवस्ती (देवळाली) जिल्हा परिषद शाळेचे नाव राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन संस्थेच्या पोर्टलवर

करमाळा(दि. १९) : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैदवस्ती (देवळाली) या छोट्याशा जिल्हा परिषद मराठी शाळेचे नाव थेट राष्ट्रीय पातळीवर झळकले आहे.

शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम, वंचितांचे शिक्षण, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राबविलेले उपक्रम, विद्यार्थी व पालकांमधील अज्ञान,अंधश्रद्धा दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न या सर्वांमुळे नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (निपा) या संस्थेने शिक्षण मंथन या बुकलेट मध्ये शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे.

राज्यातील निवडक शाळा मधून वैदवस्ती जिल्हा परिषद शाळेची निवड होणे ही सोलापूर जिल्ह्यासाठी तसेच या छोट्याशा गावासाठी गौरवाची बाब ठरली आहे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रफुल्लता बाबासाहेब सातपुते व त्यांचे सहकारी शिक्षक यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने केलेले प्रयत्न त्यामुळे यश प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांमधील अंधश्रद्धा कमी करण्याचे कार्य तसेच सायन्स वॉल च्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचे कार्य शाळेने केले आहे. राष्ट्रीय पोर्टलवर शिक्षण मंथन या बुकलेटमध्ये पहिल्या पानावर वैदवस्ती शाळेच्या सायन्स वॉलचा फोटो प्रसिद्ध झाला आहे.


विद्यार्थ्यांची बोलीभाषा तेलगू असल्याने त्यांना प्रमाण भाषा व बोलीभाषा यांची सांगड घालून अध्यापन केले जाते. आनंदायी शिक्षण, डिजिटल व कृतीयुक्त शिक्षण, वृक्षारोपण,नवभारत उल्हास साक्षरता अभियान,सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक क्षेत्र भेट, अंधश्रद्धा निर्मूलन,बुके ऐवजी बुक चा वापर, महिला मेळावे, सुसज्ज ग्रंथालय इत्यादी उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जातो.

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न,संस्कार, शाळा व्यवस्थापनातील कौशल्यामुळे वैद वस्ती शाळेची यशोगाथा इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अशा शाळांच्या यशोगाथा राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध करून इतरांनीही त्या वाचाव्यात, आदर्श घ्यावा या हा यामागचा उद्देश आहे. शाळेचा विकासात ग्रामपंचायत देवळाली तसेच वैद वस्ती शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांचे मोठे योगदान मिळालेले आहे.


