वीट येथे भीषण अपघात — अंजनडोहचे तिघेजण जागीच ठार- कारमधील अनेकजण जखमी

करमाळा: वीट गावाजवळ शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात अंजनडोह येथील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून इनोव्हा कारमधील अनेक जण जखमी झाले आहेत. मोटरसायकल आणि इनोव्हा कार यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला.

अंजनडोह गावातील हनुमंत मल्हारी फलफले( वय-35),कांचन फलफले(वय-30) आणि स्वाती शरद काशीद (वय-25)(रा. सराफवाडी, ता. इंदापूर) हे तिघेजण करमाळ्यावरून मोटरसायकलने अंजनडोह कडे परतत होते. दरम्यान पुण्याकडून येणाऱ्या इनोव्हा कारची व मोटरसायकलची वीट गावाजवळ समोरासमोर धडक झाली. धडकेत मोटरसायकल अक्षरशः चिरडली गेली आणि तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

कारलाही तीव्र धक्का बसून तीच्या तीन पलट्या झाल्या. यात कार्तिक दत्तात्रय होले (वय ३), अपर्णा दत्तात्रय होले(वय-25) होलेवाडी (कर्जत) हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच कारमधील राजू विनोद धोत्रे, जयश्री विनोद धोत्रे, भारत पंजाबी, ईशान सोनी, विनोद धोत्रे व राहुल धोत्रे हेही जखमी झाले असून सर्वांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची बातमी समजताच अंजनडोह गावात शोककळा पसरली. हनुमंत आणि कांचन फलफले हे कष्टाळू व समंजस दांपत्य म्हणून ओळखले जात होते. स्वाती काशीद या हनुमंत यांची बहीण असून ती यात्रेनिमित्त गावाकडे आली होती.


अपघातस्थळी नवनाथ जाधव, बिभीषण ढेरे, आनंद किसवे, रेवना जाधव यांनी तत्परतेने मदतकार्य केले. जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर माजी चेअरमन दिग्विजय बागल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप, राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष सतीश निळ, नगरसेवक अतुल फंड, सचिन घोलप, अॅड. घोलप आदींनी रुग्णालयात भेट देऊन जखमीची विचारपूस केली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.


