विहाळचे सुपुत्र डॉ. सुरवसे यांचे पेटंट ब्रिटन सरकारकडून प्रकाशित
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : विहाळ गावचे सुपुत्र प्राध्यापक डॉ. राजेश सुरवसे यांचे ‘स्मार्ट प्लॅंन्ट मॉनिटरिंग सिस्टीम’ या विषयावरील पेटंट ब्रिटन सरकारकडून प्रकाशित करण्यात आले असून सदर पेटंटला ब्रिटन सरकारने अनुदान देखील मंजूर केले.
डॉ. सुरवसे यांनी स्मार्ट प्लॅंन्ट मॉनिटरिंग सिस्टीम ही प्रणाली विकसित केली असून यामध्ये वनस्पतींच्या आरोग्याचे निरीक्षण आणि नियंत्रण करणारे सेंसर तंत्रज्ञान वापरले आहे. या प्रणालीद्वारे बदलते हवामान आणि जमिनीतील आर्द्रतेची पातळी इ. डेटा संकलित करून त्याचे मूल्यांकन केले जाते व आपल्या मोबाईलवर त्याची सर्व माहिती पाठविली जाते तसेच वनस्पतीच्या नुकसानाचे इशारेदेखील वापरकर्त्याला पाठविले जाते.
स्मार्ट प्लॅंन्ट मॉनिटरिंग सिस्टीम मध्ये तापमान सेन्सर, ओलावा सेंसर आणि आर्द्रता सेंसर वापरलेले आहेत जे जमिनीतील अंदाजे तापमान, ओलावा आणि आर्द्रता मोजतात त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी वापरण्यास मदत होते. म्हणजेच जास्त अथवा कमी सिंचन टाळले जाते.
सदर प्रणाली उत्पादन वाढवण्यासाठी आणि पर्यावरणीय दुष्परिणामाचा प्रभाव कमी करण्यासाठी व वनस्पतींचे आरोग्याचे अचूक निरीक्षण करण्याची एक महत्त्वाची पद्धत असून, याच्या आधारे शेतीतील पाण्याची पातळी, मातीची गुणवत्ता आणि रोगजनक किंवा कीटकांच्या उपस्थितीचे सतत निरीक्षण केले जाऊ शकते. त्यामुळे एकूणच उत्पादन वाढवण्यास मदत होते.
डॉ. राजेश सुरवसे यांचे आतापर्यंत भारत सरकारकडून 37 पेटंट प्रकाशित करण्यात आलेले असून त्यातील चार पेटंटला अनुदान मंजूर झालेले आहे. या यशाबद्दल डॉ. राजेश सुरवसे यांचे सर्व स्तरातून विशेषतः विहाळ परिसरातून कौतुक होत आहे.