'दहिगाव उपसासिंचन योजने'संदर्भात कोणतीही वस्तूस्थिती न पाहता चुकीचे आंदोलन - विलास पाटील.. - Saptahik Sandesh

‘दहिगाव उपसासिंचन योजने’संदर्भात कोणतीही वस्तूस्थिती न पाहता चुकीचे आंदोलन – विलास पाटील..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुक्यातील पूर्व भागाला वरदानी ठरलेल्या दहिगाव उपसा सिंचनयोजनेबद्दल कोणतीही वस्तूस्थिती न पाहता वास्तवाचा विपर्यास करण्याचे काम काही मंडळींकडून जाणीवपूर्वक घडत आहे, प्रत्यक्षात दहिगाव योजनेचे वास्तवच कोणी विचारात न घेता चुकीच्या पद्धतीने आंदोलन करत आहेत, असे मत लव्हे गावचे विद्यमान सरपंच प्रतिनिधी तथा पंचायत समितीचे माजी सदस्य विलास दादा पाटील यांनी व्यक्त केले.


दहिगाव योजनेसंदर्भात जादा बोलताना विलास पाटील म्हणाले की, आंदोलन आणि आंदोलनाच्या बातम्या पाहिल्यानंतर मी काही सहकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या दहिगाव येथील पंप हाऊस व मुख्य कॅनॉलची पाहणी केली आहे, यामध्ये प्रत्यक्षात दहिगाव योजनेचे वास्तवच कोणी विचारात न घेता चुकीच्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी 26 एप्रिल 2022 रोजी उजनी धरणामध्ये 32 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यावर्षी मात्र 26 एप्रिल 2023 रोजी तो पाणीसाठा अवघा 7 टक्के आहे. त्यामुळे मागीलवर्षीपेक्षा 25 टक्के पाणीसाठा कमी असल्यामुळे याचा परिणाम म्हणून दहिगाव येथील पंपांचा डिस्चार्ज 100% हुन फक्त 50% पर्यंत आलेला आहे. गेल्या वर्षी मे अखेरीस बंद पडलेली ही उपसा सिंचन योजना यावर्षी मात्र मे महिन्याच्या प्रारंभीच बंद होणार आहे .अशा परिस्थितीमध्ये या योजनेचे पाणी 100 टक्के दाबाने मिळू शकत नाही. हे वास्तव असताना या वास्तवाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्याचा विपर्यास केला जात आहे, आणि चुकीच्या पद्धतीने आंदोलने केली जात आहेत ,पाण्याची मागणी केली जात आहे, त्यातून विनाकारण लोकांच्या जीवनामध्ये समृद्धी आणणारी दहिगाव योजना मात्र बदनाम ठरत आहे असेही त्यांनी म्हटले आहे.


आम्ही दहिगाव योजनेच्या कार्यक्षेत्रातीलच शेतकरी पाणी उचलत आहोत – चंद्रहास बापू निमगिरे (माजी सभापती)
दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यांमध्ये (दहिगाव ते कुंभेज) जवळपास 800 हेक्टर क्षेत्र हे कमांड मधील आहे .या क्षेत्राला पाणी देण्यासाठी दहिगाव योजनेची चारी, उपचारीची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे शेतकरी स्वखर्चाने पाईपलाईन करून विद्युत पंपाद्वारे मुख्य कॅनॉल वरून शेतीसाठी पाणी घेत आहे. त्याची रीतसर वार्षिक 10000/- पाणीपट्टी सुद्धा भरत आहे .असे असताना पहिल्या टप्प्यांमध्ये पाणी उपसा केल्यामुळे टेलला पाणी मिळत नाही अशी ओरड केली जात आहे ती चुकीची असून आम्ही दहिगाव योजनेच्या कार्यक्षेत्रातीलच शेतकरी पाणी उचलत आहोत.


रब्बी आवर्तनात समाधानकारक – रवींद्र वळेकर (तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी पदवीधर)
उन्हाळी आवर्तनाचे पाणी आम्हाला मिळायलाच पाहिजे याबद्दल आम्ही आग्रही आहोत. दरवर्षी उन्हाळी आवर्तनामध्ये टेलला पाणी कमी येते, त्याला कारणेही वेगळी असली तरी अधिकाऱ्यांकडे याविषयी अगोदरपासूनच पाठपुरावा केल्यामुळे रब्बी हंगामामध्ये टेल मधील सर्वच गावांना जवळपास 60 दिवस समाधानकारक पाणी मिळाले आहे, आमची आजही उन्हाळी आवर्तनाची पाण्याची मागणी कायम आहे ,परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा खालवल्यामुळे आम्हाला पाणी मिळायला मर्यादा येत आहेत.


पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा आणि जमा केलेल्या पाणीपट्टीच्या प्रत्येक रुपयाचा हिशोब देणारसंजय अवताडे (उपाभियंता, कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक 12.)
दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन 7 जानेवारी 2023 पासून सुरू झाले असून त्याचा प्रत्येक दिवसाचा पाण्याचा रिपोर्ट तयार आहे. कोणत्याच गावावरती पाणी वाटपामध्ये अन्याय झालेला नसून सर्वांना न्याय पद्धतीने पाणी वाटप सुरू आहे .महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे महामंडळाकडून विज बिल भरणा करण्यासाठी शेतकऱ्यांकडून जवळपास 50 लाख रुपयांच्या आसपास पाणीपट्टी जमा केलेली असून त्या प्रत्येक रुपयाचा हिशोब द्यायला आपण तयार आहोत. हे उन्हाळी आवर्तन संपल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपण याबद्दल सविस्तर खुलासा करू अशी माहिती श्री अवताडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!