केतूर येथे पावसामुळे रस्त्यांची दैना – मुरूम टाकण्याची ग्रामस्थांची मागणी

करमाळा(दि.२६): केतूर येथील शिवाजी चौक ते केतूर क्रमांक १ कडे जाणाऱ्या रस्त्याची झालेल्या पावसाने अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता चिखलमय झाला असून अर्धा फूट पाणी रस्त्यावर साचले जात आहे. यामुळे वृद्ध, शाळकरी मुले व सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून चालणे धोकादायक बनले आहे.

पावसाआधीच येथील नागरिक राजेंद्र खटके यांनी ग्रामपंचायतीकडे विठ्ठल रुक्मिणी मंदिरा समोरील या रस्त्यावर मुरूम टाकण्याची मागणी केली होती. ग्रामसभेत हा विषय मंजूर झाला होता. तरीसुद्धा या निवेदनाची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या झालेल्या पावसाने रस्त्यावर पाणी व मोठे खड्डे झाले आहेत.

याआधी अनेक लहान मुले आणि वृद्ध नागरिक घसरून पडले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. जर तातडीने मुरूम टाकून रस्त्याची दुरुस्ती झाली नाही, तर ग्रामपंचायत कार्यालयावर विद्यार्थ्यांसह मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा राजेंद्र खटके यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.




