अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्थेचे कार्यप्रशंसनीय – विवेक येवले


करमाळा (संदेश प्रतिनिधी) : अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्था, नाशिक या संस्थेच्या करमाळा केंद्राच्या वतीने राबविण्यात येणारे विविध सामाजिक उपक्रम हे प्रशंसनीय तर आहेतच पण अनुकरणीय देखील असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते विवेक येवले यांनी येथे बोलताना केले.या संस्थेच्या व गयाबाई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित एकलव्य निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य व गणवेश वाटप कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास एकलव्य आश्रमशाळेचे संस्थापक-अध्यक्ष,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने,अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा केंद्र अध्यक्ष संतोष कुलकर्णी,ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष संजय मोरे,गयाबाई बहुउद्देशीय संस्थेचे किसन कांबळे,सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव भोसले,फिटनेस ट्रेनर महेश वैद्य,संजय राजेघोरपडे,भारत घुगेकर,सिद्धार्थ वाघमारे आदी उपस्थित होते.


यावेळी पुढे बोलताना येवले म्हणाले,आज आपल्या समाजात विविध जाती-धर्मामध्ये विशेषतः ब्राह्मण समाजाविषयी तेढ वाढविण्याचे सुरू असलेले प्रयत्न निंदनीय आहेत.या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये व देश उभारणीमध्ये ब्राम्हण समाजाचे योगदान कुणीच नाकारू नये.आज आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली “स्वातंत्र्य, समता व बंधुभाव “ही शिकवण आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हा संदेश अमलात आणण्याची गरज आहे.

सुरुवातीस आश्रमशाळेचे शिक्षक किशोरकुमार शिंदे व जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक केले.यावेळी कुलकर्णी, कांबळे,माने,राजेघोरपडे, भोसले आदींची भाषणे झाली.शेवटी मुख्याध्यापक अशोक सांगळे यांनी आभारप्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!