‘व्यवसायिक शिक्षण ही काळाची गरज’ – व्याख्याते नंदकिशोर वलटे
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा’ अभियान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उमरड येथे राबविण्यात आले. यावेळी व्याख्याते नंदकिशोर वलटे याचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कौशल्य विकासावर व्याख्यान देताना व्याख्याते नंदकिशोर वलटे यांनी व्यवसाय शिक्षणाचे महत्व विध्यार्थ्यांना पटवून दिले व व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.आपल्या व्याख्यानात त्यांनी अनेक उदाहरणे देऊन पारंपरिक शिक्षण प्रणाली कालबाह्य झाल्याचे पटवून दिले. विद्यार्थ्यांनी केवळ नोकर बनण्यापेक्षा स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करून मालक बना असा संदेश दिला. स्वयंरोजगार, उदयोग,व्यापार या संकल्पना समजून घ्या व या बदलत्या युगात ज्ञानाबरोबर शहाणपण अंगीकारावे आणि स्वतःची वाट स्वतः निवडावी असे सांगितले.
व्याख्यानाची सुरुवात क्रांतिजोति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली.या कार्यक्रमासाठी प्राथमिक शाळेच्या विधर्थ्यासह बदे विद्यालयाचे विदयार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय कोठावळे हे होते. त्यांच्या सोबत मुख्याध्यापक सीताराम भिल,वामनराव बदे विद्यालयाचे शिक्षक महेश बदे,बागडे सर,भोसले सर,राऊत सर,यादव मॅडम उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल यादव सर यांनी केले.