अवघ्या ७ किमी रस्ता दुरुस्तीसाठी  वर्षानुवर्षे प्रतीक्षा; मिरगव्हाण ग्रामस्थांचे दैनंदिन दळणवळण बिकट -

अवघ्या ७ किमी रस्ता दुरुस्तीसाठी  वर्षानुवर्षे प्रतीक्षा; मिरगव्हाण ग्रामस्थांचे दैनंदिन दळणवळण बिकट

0
अर्जूननगर फाटा ते मिरगव्हाण दरम्यानचा रस्ता (छायाचित्र: सचिन भस्मे,मिरगव्हाण)

करमाळा(दि.३१): करमाळा तालुक्यातील अर्जुननगर फाटा ते मिरगव्हाण दरम्यानचा ७ किमीचा रस्ता अत्यंत खराब झाला असून, अनेक वर्षांपासून रस्ता दुरुस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी मिरगव्हाण ग्रामस्थांसाठी हा रस्ता रोजच्या दळणवळणासाठी मोठे दुखणे ठरत असून, दुरुस्ती कधी होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. या रस्त्यासाठी २०२४ मध्ये मंजुरी मिळाली असली तरी गेल्या दोन वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप कोणतीही प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात आलेली नाही.

या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून डांबरीकरण झालेले नाही. पूर्वीचे केलेले डांबरीकरण गेले दहा वर्षांपूर्वीच उखडून गेले असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी दगडधोंडे व उचकटलेली खडी दिसून येत असल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. खराब रस्त्यामुळे चारचाकी वाहनांचे नुकसान होत असून दुचाकी घसरण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे छोटे-मोठे अपघात होत असून दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अवघा सात किलोमीटरचा लांबीचा हा रस्ता पार करण्यासाठी सुमारे पाऊण तासाचा वेळ लागत असल्याने लोकांचे दळणवळण त्रासदायक झाले आहे.

मिरगव्हाण गावाची लोकसंख्या सुमारे तीन हजार असून दैनंदिन दळणवळणासाठी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर याच रस्त्याचा वापर करतात. शेलगाव फाट्यापासून मिरगव्हाणकडे येणारा हा रस्ता पुढे धाराशिव व बीड जिल्ह्यांकडे जात असल्याने दररोज शेकडो वाहनांची ये-जा या मार्गावरून होते.

या रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना ट्रॉली पलटी होण्याचा धोका पत्करून वाहने चालवावी लागत आहेत. त्यातच गावातील सांडपाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावर साचत आहे. त्यामुळे चिखल तयार होऊन दुर्गंधी पसरत असून आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.


या सर्व बाबींची तातडीने दखल घेऊन अर्जुननगर फाटा–मिरगव्हाण रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी मिरगव्हाण ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

अर्जूननगर फाटा ते मिरगव्हाण दरम्यानचा रस्ता (छायाचित्र: सचिन भस्मे,मिरगव्हाण)
बातमी संपादन: सुरज हिरडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!