वांगी नं. ३ येथे अवैध वाळू उपसा; ४.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

करमाळा (दि.१८) – करमाळा तालुक्यातील वांगी नं. ३ येथे अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर करमाळा पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे १९ ब्रास वाळु व एक टेम्पो असा ४.९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी सांगितले की, दि. १६ मे रोजी करमाळा तालुक्यातील वांगी नं. ३ येथे चोरीची वाळू वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले.

छापा टाकताना सुहास उर्फ सिद्धू भारत तावसे आणि राजेश महेंद्र रोकडे हे वाळूने भरलेला टेम्पो घेऊन पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून उजनी जलाशयाकडे जाणाऱ्या टेम्पो (क्र. एम. एच. १०/के-८२१८) ला अडवले असता, चालक आनंद सुखदेव सातव हा टेम्पो सोडून फरार झाला. त्या टेम्पोमध्ये १ ब्रास वाळू आढळून आली. याशिवाय घटनास्थळी उजनी जलाशयाजवळ वाळूचा मोठा ढिगारा आढळून आला. पंचनाम्यानुसार १८ ब्रास वाळू (अंदाजे १.८० लाख रुपये), टेम्पो व त्यातील १ ब्रास वाळू (३.१० लाख रुपये), असा एकूण ४.९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी वरील तिघांविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३९२/२०२५ अन्वये भा.दं.वि. कलम ३०३ (२), ३(५) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ९ व १५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रणजित माने, पोलिस नाईक – प्रमोद गवळी, मनिष पवार, वैभव टेंगल, पोलिस शिपाई – सोमनाथ जगताप, अर्जुन गोसावी, रविराज गटकुळ, ज्ञानेश्वर घोंगडे, विलास आलदर आणि चा. पो. शि. राहुल माने यांनी ही कारवाई केली.


