पोथरे,संगोबा येथे ६ महिन्यांपासून बंद पडलेले वॉटर एटीएम २ दिवसात झाले सुरू

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर काम कसे तातडीने पूर्णत्वास जाते याची प्रचिती पोथरे, संगोबा ग्रामस्थांना आली. पोथरे,संगोबा येथे ६ महिन्यांपासून बंद पडलेले वॉटर एटीएम २ दिवसात सुरू झाले.
पोथरे ग्रामपंचायत अंतर्गत लाखो रुपये खर्च करून सर्वसामान्यांनांसाठी शुद्ध पाणी अल्प दरात मिळण्याच्या उद्देशाने निलज, संगोबा, पोथरे, जिल्हा परिषद शाळा येथे आरओ फिल्टर प्लॅन्ट लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आले होते. परंतु गेली सहा सात महिन्यांपासून ठेकेदारांच्या दुर्लक्षतेमुळे आरओ फिल्टर बंद पडले होते. हे आर ओ फिल्टर चालू करण्यात यावे अशी ग्रामस्थांनी मागणी केली होती. राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी ही बाब गटविकास अधिकारी, सरपंच यांना निवेदन देऊन निदर्शनास आणून दिली होती. सदर मागणीबाबत १९ जुलै रोजी संदेश न्यूजने देखील बातमी प्रसिद्ध केली होती.
या सर्व बाबींची तात्काळ दखल घेऊन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दोन दिवसात पोथरे,संगोबा येथील बंद असलेलें आरओ पाणी फिल्टर तात्काळ चालू करण्याचे आदेश दिले आणि ते चालू देखील झाले. यामुळे मनोज राऊत यांच्या कामाचे पोथरे निलज,संगोबा ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे. यामध्ये पोथरे-निलज ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच अंकुश शिंदे, ग्रामसेवक हरीभाऊ दरवडे यांनी देखील ठेकेदाराकडे पाठपुरावा करून उर्वरित कामे पूर्ण करून घेतली.
संबंधित बातमी : लाखो रूपये खर्च करून देखील पोथरे,निलज,संगोबा ग्रामस्थ फिल्टर पाण्यापासून वंचित



