‘हिसरे’ च्या पुलावरून वाहिले पाणी – पुलाची उंची तात्काळ वाढवण्याची गरज – युवासेनेची मागणी
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : हिसरे (ता.करमाळा) येथील रस्त्यावरील धोकादायक पुलाची उंची तात्काळ वाढवा अशी मागणी युवासेना तालुकाप्रमुख शंभुराजे फरतडे यांनी जिल्हापरिषद बांधकाम विभागाकडे केली आहे. हे काम तात्काळ करावे, अन्यथा फिसरे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका प्रमुख शंभुराजे यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी पुढे म्हटले कि, हिसरे करमाळा रस्त्यावर असलेला पुल अतिशय जीर्ण झाला असून उंची कमी असल्याने एखादा मोठा पाऊस झाला की लगेच पुलावरून पाणी ओसंडु लागत असल्याने चार चार तास वाहतूक खोळंबली जात असून प्रवाशांसाठी धोकादायक बनत आहे. या रस्त्यावरुन गौंडरे, कोळगाव, हिसरे, हिवरे या गावातील नागरिक प्रवास करत असतात तसेच हिवरे येथील श्रि नागनाथ देवस्थान च्या दर्शनासाठी देखील भावीक या रस्त्यावरुन येत असतात. जवळच सिद्धेश्वर विद्यालय असून विद्यार्थ्यांना देखील पावसाळ्यात मोठी गैरसोय होत आहे.
संबंधित विभागाकडे या पुर्वी देखील अनेक वेळा या संदर्भात मागणी केली आहे मात्र पुलाच्या व रस्त्याच्या प्रश्नांकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.आठ दिवसाच्या आत या रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण करुण बुजवावेत तसेच पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन उंची वाढवुन नवीन पुलाचा प्रस्ताव पाठवावा अन्यथा फिसरे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका प्रमुख शंभुराजे यांनी दिला आहे.