पाणी टंचाई आढावा बैठकीत निकृष्ट कामांबद्दलच्या तक्रारी – आमदार पाटील यांच्याकडून अधिकाऱ्यांची कान उघडणी

करमाळा(दि.२८) : काल करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात आमदार नारायण पाटील व तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या उपस्थितीत करमाळा तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक व अनेक नागरिक उपस्थित होते.
या बैठकीत अनेक गावातील सरपंचांनी, ग्राम सेवकांनी आपापल्या गावातील समस्या मांडल्या. जलजीवनची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे सांगत नागरिकांनी संताप व्यक्त केला. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी शेख यांनी अनेक गावांत कामे पूर्ण झाल्याची माहिती यावेळी दिली. परंतु गावात अद्यापही नागरिकांनी पाणी मिळत नसून निकृष्ट दर्जाची कामे झाली आहे. जुन्याच कामांना नवीन रूप दिले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली. याचबरोबर अनेक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याबाबत देखील माहिती दिली.

यावर आमदार नारायण पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. जलजीवन योजनांच्या बाबतीत सर्व माहिती घेऊन एका समितीद्वारे प्रत्यक्षात कार्यस्थळावर जाऊन पाहणी केली जाईल. यात दोषी सापडलेल्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा आमदार पाटील यांनी दिला. करमाळा तालुक्यात अधिकाऱ्यांनी आपल्या कामात कोणत्याही प्रकारची हयगय करू नये. शासन स्तरावरून येथील कामांची माहिती विचारली असता कुणीही अधिकाऱ्याने चुकीची माहिती देऊ नये, अन्यथा त्यांची गय केली जाणार नाही.
नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागु नये म्हणून नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत. पाणी टंचावर मात करण्यासाठी आताच योग्य कार्यक्रम हाती घ्यावा. आमदार म्हणुन आपणास हवे ते सहकार्य केले जाईल असा विश्वास त्यांनी दिला.
सर्वसामान्य माणसाला एकाच कामासाठी हेलपाटा घालायला लावणे, एखाद्याचे काम अडवून ठेवणे माझ्या आमदार पदाच्या काळात चालणार नाही असा देखील इशारा आमदार नारायण पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला. जनतेने मला पुन्हा चांगले काम करण्यासाठी आमदारकीची पुन्हा संधी दिली आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी काम घेऊन आलेल्या नागरिकांचे समाधान करून आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना केले.





