करमाळा नगरपरिषद इमारत कधी होणार ? – कर्मचाऱ्यांचे व नागरिकांचे हाल – पालिकेचा कारभार चालतो कोंडवड्यातून..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सोलापूर जिल्ह्यातील १५६ वर्षाच्या सर्वात जुन्या असलेल्या करमाळा नगरपालिकेला कार्यालय नसल्याने या पालिकेचा कारभार चक्क चालतो कोंडवड्यातून. अपुऱ्या इमारतीत कसेबसे कामकाज चालवले जात आहे. त्याचा त्रास कर्मचारी व नागरीकांनाही होत आहे. शासनाने दिलेल्या मंजुरीनूसार या इमारतीचे काम तातडीने व मजबूत करावे; अशी नागरीकांची मागणी आहे.

करमाळा नगरपालिकेची स्थापना ब्रिटीश कालावधीत १ मे १८६७ साली झाली आहे. सध्या पालिकेचे वय १५६ वर्ष आहे. अशा जुन्या पालिकेला कार्यालयीन इमारतच नसल्यामुळे फेब्रुवारी २०१८ पासून किल्ला या येथील ज्ञानेश्वर वाचन मंदिराच्या इमारतीतून पालिकेचा कारभार चालतो. हा भाग म्हणजे या पालिकेचा पूर्वीचा कोंडवडा होता. पालिकेचा कारभार पूर्वी छोट्याशा इमारतीतून चालत होता. सन १९४९ साली तत्कालीन नगराध्यक्ष कै. अण्णासाहेब जगताप यांच्या कारकिर्दीत पालिकेच्या इमारतीचे बांधकाम झाले होते. त्या इमारतीत पालिकेचे कार्यालय, सभागृह, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष कक्ष असे विभाग होते. तसेच ही इमारत दुमजली होती. ( म्हणजे आजही अस्तित्वात आहे.) त्यावेळी पालिकेचे कामकाज तीन विभागात चालत होते. त्यामध्ये बांधकाम, दिवाबत्ती व पाणी पुरवठा आणि स्वच्छता, आरोग्य विभाग याचा समावेश होता. तर फक्त ३० कर्मचारी कार्यरत होते. पुढे पालिकेचा कारभार वाढला व ३० कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास १७८ वर गेली ( ठेकेदारासह). कामकाजाचे विभाग वाढले. त्यानुसार पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य, बांधकाम, हिशोब विभाग, घरपट्टी – पाणीपट्टी वसुली, शिक्षण – ग्रांथालय, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष कार्यालय असे एक ना अनेक कार्यालय आहेत.

पालिकेने यासाठी पुणे रस्त्यावर नवीन इमारत बांधण्याचे ठरवले व त्यानूसार सन १९९२ ला पुर्वीच्या यशवंत उद्यान या जागेतच जयप्रकाश टाऊन हॉलच्या मागे दोन एकर अशा प्रशस्त जागेत नवीन इमारत बांधण्याचे धोरण आखले. सुरूवातीला या कामासाठी १७ लाख २३ हजार २६९ रूपयाची निविदा काढली व ते काम १६ डिसेंबर १९९२ ला तत्कालीन पालिकेचे ठेकेदार कै. आर. आय. परदेशी यांना दिले. पण ते काम १९९६ पर्यंत अवघे सात लाख रूपये खर्चाचे झाले. सन १९९६ साली पालिका निवडणूक झाली. सत्तांतरण झाले व देवी गटाकडून जगताप गटाकडे सत्ता गेली. जगताप गटाने १४ फेब्रुवारी १९९९ ला दुसरी २६ लाख ६६ हजार ३५९ रू किंमतीची निविदा काढली. ते काम नव्या ठेकेदाराकडे गेले पण ते काम सदोष झाले. या नव्या इमारतीचा शुभारंभ २१ ऑगस्ट २००१ रोजी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते झाला. पण पहिल्या वर्षापासूनच या इमारतीला गळती लागली. पुढे पुढे तर प्रचंड गळती लागली व फेब्रुवारी २०१८ पासून ही इमारत पुर्णत: बंद केली व पालिका प्रशासन ज्ञानेश्वर वाचन मंदिरात आले. ते गेल्या पाच वर्षापासून अद्यापही अनंत अडचणीतून सुरू आहे.
शासनाने पालिकेच्या इमारतीसाठी १९ एप्रिल २०२२ रोजी ४ कोटी ५५ हजार रूपये मंजूर केले आहेत. मध्यंतरी सरकार बदलले व या कामास स्थगिती आली होती. पुन्हा नवीन सरकारनेही या खर्चास मान्यता दिली आहे. त्यानुसार आत्तापर्यंत तांत्रिक मंजुरी घेतली आहे. मा. जिल्हाधिकारी साहेबांची प्रशासकीय मान्यता मिळाली की या कामाची निविदा निघेल व काम सुरू होईल. केवळ पालिका इमारतच नाहीतर पालिकेच्या सांस्कृतीक भवनसाठीही शासनाने ५ कोटी ५४ लाख ४५ हजार मंजूर केले आहेत. ते कामही केले जाईल तसेच छत्रपती शिवरायांच्या अश्वरूढ पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी ४५ लाख रूपये मंजूर झाले आहेत. ही कामे लवकरच पुर्ण होतील. – बालाजी लोंढे (मुख्याधिकारी, करमाळा नगरपरिषद)

