नवरात्र महोत्सवातील विविध कार्यक्रमात विधवा महिलांना सन्मानाने सहभागी करून घ्यावे

करमाळा (दि.६) – नवरात्र महोत्सवातील दांडियाचा खेळ तसेेच धार्मिक कार्यक्रमात विधवा महिलांना सन्मानाने सहभागी करून घ्यावे असे आवाहन करमाळा (जि. सोलापूर) येथील महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा विधवा महिला सन्मान चळवळीचे प्रणेते प्रमोद झिंजाडे यांनी प्रेसनोटद्वारा विविध नवरात्रोत्सव मंडळांना केले आहे.

त्यामध्ये म्हटले आहे की, सध्या आपल्या महाराष्ट्रात आणि देशात नवरात्र चालू आहे. यानिमित्त दुर्गादेवीची पूजा आरती नऊ दिवस चालते. या नवरात्रीच्या कार्यक्रमामध्ये सर्व महिला, पुरुष, मुले उत्साहाने सहभागी होऊन आनंद साजरा करतात. मात्र यामध्ये महिलांंच्या दांडियाचा खेळ तसेेच धार्मिक कार्यक्रमात जसे की दुर्गामातेची पूजा, आरती यामध्ये विधवा महिलांना अशुभ म्हणून सहभागी करून घेतले जात नाही. तेव्हा हा भेदाभाव करणे म्हणजेच संविधानाने आपल्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा अधिकाराचा भंग आहे. ही भेदाभेद करणे अमानवी असून मानवाधिकारांंच्या विरोधात आहे. तेव्हा नवरात्र /दुर्गा मातेच्या महोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सचिवाने आपल्या परिसरातील विधवा महिलांना देखील या कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी ही नम्र विनंती. आपल्या सहकार्याने विधवा महिलांना बळ मिळून महिलांना कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.






