संक्रांतीच्या हळदीकुंकू कार्यक्रमात विधवा महिलांचा समावेश करून त्यांना सन्मान देण्यात यावा – प्रमोद झिंजाडे

करमाळा:मकर संक्रांतीदिनी विधवा महिलांनाही हळदी-कुंकू,तिळगुळ कार्यक्रमात सन्मानाने सहभागी करून घ्यावे, असे आवाहन विधवा महिला सन्मान चळवळीचे प्रणेते प्रमोद झिंजाडे यांनी केले आहे. समाजातील अशुभतेच्या अंधश्रद्धेमुळे विधवा महिलांना दूर ठेवण्याची प्रथा मोडून काढण्यासाठी त्यांनी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले.

१४ जानेवारी रोजी भारतभर मकर संक्रांत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी महिला, मुले, मुली तसेच ज्येष्ठ नागरिक एकमेकांना हळदीकुंकू लावून तिळगुळ देत ‘घ्या गोड बोला’ असा संदेश देतात. घरोघरी गोडधोड पदार्थ केले जातात आणि आनंदाचे वातावरण असते.
मात्र, आपल्या कुटुंबातील, गावातील किंवा नातेवाईकांपैकी एखादी महिला विधवा असल्यास तिला अनेकदा या आनंदोत्सवात सहभागी करून घेतले जात नाही. समाजात अजूनही अशुभतेच्या गैरसमजुतीमुळे तिला हळदीकुंकू व तिळगुळ कार्यक्रमांपासून दूर ठेवले जाते, ही बाब खेदजनक असल्याचे झिंजाडे यांनी सांगितले.

यासाठी त्यांनी समाजाला आवाहन केले की, मकर संक्रांतीदिनी विधवा महिलांनाही सन्मानाने सहभागी करून घ्यावे. धार्मिक भावना असल्यास देवळात किंवा घरातील देव्हाऱ्यात त्यांच्या हस्ते दिवा लावावा, नैवेद्य अर्पण करावा तसेच हळदीकुंकू व तिळगुळ कार्यक्रमांमध्ये त्यांचा समावेश करावा.
ज्या गावांमध्ये हा उपक्रम आधीच राबविला जात आहे, त्यांचे त्यांनी अभिनंदन केले. मात्र ज्या गावांमध्ये अजूनही विधवा महिलांना सहभागी करून घेतले जात नाही, तेथे कोणत्याही जातीतील सुशिक्षित व धाडसी विधवा महिलेने पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सुचविले. गावातील किमान पंधरा ते वीस विधवा महिलांची यादी तयार करून मकर संक्रांतीदिनी त्यांना एका ठिकाणी बोलावून हळदीकुंकू लावावे, तिळगुळ द्यावा व वाण म्हणून छोटी भेटवस्तू द्यावी, असे त्यांनी आवाहन केले.

या उपक्रमासाठी पुढाकार घेणाऱ्या पहिल्या वीस विधवा महिलांना प्रत्येकी पाचशे रुपये फोनपेच्या माध्यमातून वैयक्तिक मदत देण्यात येईल, असे झिंजाडे यांनी जाहीर केले आहे. सहभागी महिलांनी आपले नाव, गावाचे नाव, मोबाईल क्रमांक तसेच कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ 7775903052 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावेत, असेही त्यांनी सांगितले.
या उपक्रमातून विधवा महिलांना सन्मान, आनंद व आत्मविश्वास मिळेल आणि समाजातील अनिष्ट प्रथा मोडून काढण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपक्रम राबविताना कुणी विरोध केल्यास महिला हेल्पलाईन ११२ किंवा १८१ वर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

