पोलीसांच्या सहकार्याने खुलेआम दारूविक्री होत असल्याचा महिलांचा आरोप – उमरड मधील महिलांनी दिले निवेदन

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : उमरड (ता. करमाळा) येथे अवैध दारू विक्री चालू आहे. त्यामुळे गावातील अनेकांचे संसार धुळीला मिळाले असून, दारू विक्रीमुळे गावातील दहा जणांचे प्राण गेले आहेत, त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. अनेकवेळा सांगून, प्रयत्न करूनही गावातील दारूविक्री बंद होत नाही. ही खुलेआम दारूविक्री तात्काळ बंद करावी अन्यथा उपोषण करण्यात येईल; असा इशारा उमरड गावातील रणरागिणी महिला ग्रामसंघाने जिल्हा पोलीस प्रमुख निवेदनाद्वारे दिला आहे. ही अवैध दारू विक्री पोलीसांच्या सहकार्याने होत आहे असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे.
या संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उमरड गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अवैध दारू विक्री खुलेआमपणे चालू आहे. या दारूविक्री मुळे दारूडे दारू पिवून गावात शिवीगाळ करणे, भांडण करणे व नाहक त्रास देणे असे प्रकार करत आहेत. तसेच या दारूविक्री मुळे जवळपास गावातील दहा जणांचा प्राण गेला आहे. तसेच अनेक कुटूंबातील व्यक्ती व मुले ही दारू पिऊन बिघडली आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या दारू विक्रेत्यांना वारंवार सांगूनही ते दारू विक्री बंद करत नाहीत. याबाबत ग्रामपंचायतीने २८ जून २०२३ रोजी ग्रामसभा घेवून गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याबाबतचा ठराव ग्रामसभेत मंजूर केला आहे. तरीही खुलेआम दारूविक्री चालू आहे. पोलीसांच्या आर्थिक देवाणघेवाणीमुळे हे दारू विक्रेते कोणालाही जुमानत नाहीत; असा आरोप रणरागिणी महिला ग्रामसंघाने व गावातील अनेक महिलांनी केला आहे. ही दारूविक्री तात्काळ थांबवावी अन्यथा कार्यालय समोर उपोषण करण्यात येईल; असा इशारा रणरागिणी महिला ग्रामसंघ व ग्रामस्थांनी दिला आहे.
करमाळा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आज (ता. ४) सुमन पांडूरंग शिंदे, पल्लवी नितीन कदम, कांता विक्रम कदम, निलावती अर्जुन शिंदे, फुलाबाई अभिमान कदम, कल्पना नितीन कदम, छाया टिळक शिंदे या महिला गेल्या होत्या. सुरूवातीला पोलीसांनी त्यांचे निवेदन स्विकारले नाही. परंतू नंतर मात्र काही तासांनी या महिलांनी विनंती केल्यानंतर निवेदन स्विकारले आहे. या निवेदनावर रणरागिणी महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा वैशाली दिपक चौधरी, सचिव धनश्री चंद्रशेखर पाटील व कोषाध्यक्षा सुरेखा वसंत वलटे यांचेसह हिराबाई भाऊराव पवार, शोभा दशरथ पडवळे, कांता विक्रम कदम, लक्ष्मी गायकवाड, सोनाली मल्हारी कोठावळे, वत्सला सुरवसे, उषा सुरवसे, रंजना पाखरे, विद्या इंगळे, मंगल सुरवसे, प्रियंका चौधरी, भारती पाखरे, रेश्मा प्रशांत बदे, पल्लवी कदम, रंजना पाखरे, सुनिता भोसले, मंदा पाखरे, अंकिता भोसले आदी महिलांच्या सह्या आहेत.




