करमाळा बसस्थानकातुन महिलेची पर्स चोरी – ९१ हजारांचा ऐवज लंपास
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने महिलेची पर्स चोरी करून सुमारे ९१ हजार रुपये लंपास केले आहेत. सविता अशोक काळे (वय ४०), रा. रावकाळे वस्ती राशीन ता.कर्जत जि.अहमदनगर या महिलेने करमाळा पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 30/11/2023 रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास करमाळा बसस्थानकातील बसमध्ये चढत असताना गर्दीत माझ्या हातातील पर्सला ओढा बसल्यासारखे जाणवले. तरी सुध्दा गर्दी असल्यामुळे मी खाली न उतरता एसटीत चढले व सीटवर बसल्यावर माझी पर्स तपासून पाहिली असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने माझी पर्स चोरून घेउन गेला असल्याचे निष्पन्न झाले. पर्स मध्ये खाली नमुद केलेल्या किंमतीचे सोने व चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत –
- 46,000/- रू. किंमतीचे अंदाजे 11.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण
- 20,000/- रू. किंमतीची अंदाजे अर्धा तोळा वजनाची ठुशी
- 20,000/- रू. किंमतीची अंदाजे अर्धा तोळा वजनाची मनचली
- 5000/- रू.किंमतीचे चांदीचे अंदाजे 10 भार वजनाचे पायातील पैंजण
असा एकूण 91,000/- रू. चा ऐवज चोरीला गेला आहे. याविषयी पुढील तपास पोलीस करत आहेत.