शासनाच्या विविध योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा : नितीन शितोळे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : “शासनाच्या विविध योजना महिलांच्या विकासासाठी असून त्यांचा लाभ घ्यावा व आपला तसेच आपल्या सहकाऱ्यांचा विकास करावा” असे प्रतिपादन नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नितीन शितोळे यांनी केले ते पाभर ॲग्रो प्रोड्युसर कंपनी करमाळा यांनी शेटफळ येथे आयोजित केलेल्या बचत गट सदस्य व पदाधिकारी यांच्या नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमासाठी शेटफळ व आजूबाजूला गावातील सुमारे ५० महिला उपस्थित होत्या.

पुढे बोलताना श्री.शेळके म्हणाले की ‘शासनाच्या खूप योजना असून, त्या सर्व महिलांपर्यंत पोचवणे आवश्यक आहे’ राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या शेतीपूरक व्यवसायासाठी असलेल्या योजनांची माहिती तसेच विविध विमा योजना बाबत नितीन शेळके यांनी मार्गदर्शन केले.

नाबार्ड, बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्यातून पाभर ॲग्रो प्रोड्युसर कंपनी यांच्या सभासदासाठी पशुधन व इतर व्यवसायासाठी कर्ज वाटप करावयाचे आहे. त्यासाठी प्रस्ताव बँकेकडे द्यावेत कर्ज वाटप प्रक्रिया लवकरच सुरू करू असे बँक ऑफ इंडियाचे शाखा करमाळ्याचे शाखा व्यवस्थापक मा. राजेंद्र कुमार यांनी सांगितले

शासनाच्या योजनेसाठी आपल्याकडे सर्व कागदपत्रे असतात तथापि आपल्या अज्ञानामुळे आपले सिबिल खराब होते व आपण योजनेपासून वंचित राहतो त्यामुळे आपले सिबिल आपणच जपले पाहिजे कारण योजना जरी शासनाच्या असल्या तरी त्या बँकेमार्फत राबवला जातात त्यामुळे त्यांच्यासाठी सिबिल महत्त्वाचे आहे सर्वांनी आपले व उद्योगाचे विमे उतरून घ्यावेत म्हणजे अडचणी येणार नाहीत. असे बँक ऑफ इंडियाचे सल्लागार श्री भालेराव यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले

राष्ट्रीय पशुधन मिशन तसेच निडको (राष्ट्रीय उद्यानिता व औद्योगिक विकास कॉर्पोरेशन) यांच्यामार्फत राबवलेल्या जाणाऱ्या योजना तसेच या अंतर्गत लहान मोठे व्यवसाय प्रकल्प मोठे कारखाने सुरू करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर सहकार्य केले जाते. यामध्ये ५०% पर्यंत अनुदानाची तरतूद आहे. असे मंगळवेढ्याचे क्लस्टर हेड श्री मुबारक शेख यांनी मार्गदर्शन केले. आर्थिक साक्षरता व बँकेच्या सेवा व बँकेच्या योजना विमा योजना याबाबत क्रिसिल फाउंडेशनचे अविनाश शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणानंतर सविस्तर चर्चा होऊन जे एल जी अंतर्गत प्रस्ताव करण्यासाठी साठी काही महिला तयार झाल्या. तसेच राष्ट्रीय पशुधन मिशन अंतर्गत पाभर कंपनीच्या संचालिका वनिता पोळ या ५०० शेळ्यांसाठी, वर्षा सरडे या १०० शेळ्यांसाठी प्रस्ताव देणार आहेत तसेच निडको अंतर्गत गारमेंट व्यवसायासाठी उषा माने यांनी प्रस्ताव देण्याचे ठरवले. तसेच इतर सदस्य सभासदांनी त्यांच्या घरी चर्चा करून वेगवेगळ्या व्यवसायासाठी प्रस्ताव देण्याबाबत सुतोवाच केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पाभर कंपनीचे सदाशिव पांडव यांनी केले. आभार अनुराधा राजमाने यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!