महिलांचा सन्मान म्हणजे भविष्याची प्रगती : न्यायाधीश देवर्षी
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : समाजामध्ये पन्नास टक्के सहभाग असलेल्या महिलांमध्ये विविध गुण आहेत. ते गुण शोधून त्यांचा सन्मान करणे हो समाजाचे कर्तव्य आहे. महिला जर अधिक उत्साहीत झाल्यातर समाजाची मोठी प्रगती होवू शकेल, असे मत येथील वरीष्ठ दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश उमेश देवर्षी यांनी व्यक्त केले.
तालुका विधी सेवा समिती, करमाळा वकील संघ व न्यायालयीन कर्मचारी यांच्यावतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यशस्वी व कर्तबार महिलांचे सन्मान आयोजित करण्यात आले त्यावेळी प्रास्ताविकात न्यायाधीश देवर्षी बोलत होते. ते म्हणाले की, महिलांनी चुल व मुल ही व्याख्या बदलून आज महिला देशाच्या संरक्षणापासून ते तंत्रज्ञान क्षेत्रापर्यंत, शेती पासून औद्योगिकी करणापर्यंत तर समाजसेवेपासून राजकारणा पर्यंत महिलांनी यशस्वी कामगिरी केली आहे. अशा महिलांचे प्रतिनिधी म्हणून तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करत आहोत.
यावेळी न्यायाधीश सौ. मीना एखे, ॲड. लता पाटील, ॲड. शहानूर सय्यद , ॲड. सविता शिंदे, ऑड. अपर्णा पद्माळे, ॲड. माया जाधव, पंचायत समितीच्या कनिष्ठ प्रशासन अधिकारी माधुरी सपाटे, बचत गटाच्या सौ. ज्योती चव्हाण, विद्यार्थीनी कु. सुप्रिया बरडे, आंगणवाडी सेविका ज्योती वणवे यांचे सन्मान केले. हे सत्कार वकील संघाचे अध्यक्ष ॲड. विकास जरांडे, उपाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, सचिव ॲड. योगेश शिंपी तसेच ॲड.आकाश मंगवडे, ॲड. बलवंत राऊत ॲड. प्रशांत बागल तसेच न्यायालयाचे अधिक्षक श्री. भुशेट्टी, सहा. अधिक्षक शशीकांत कांबळे, श्री. पानगावकर, बगाडे, एस. एल. जाधव, मकानदार, घाडगे, डोईफोडे व समन्वयक रामेश्वर खराडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी न्यायाधीश आर. एस. शिवरात्री, गटविकास अधिकारी मनोज राऊत, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील बालविकास प्रकल्प अधिकारी माने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आंगणवाडी सेविका, बचतगट प्रतिनिधी व विद्यार्थीनीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यशकल्याणी सेवाभवन मध्ये झालेल्या या कार्यक्रमात शेवटी सर्वांना अल्पोपहार देण्यात आला त्यानंतर सांगता करण्यात आली.
याच कार्यक्रमात महिलांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या कायद्याबाबत मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. त्यामध्ये ॲसीड ॲटॅक, विनयभंग, अपहरण याविषयावर न्यायाधीश सौ. मीना एखे, महिलाविषयी कामगार कायदेबाबत न्यायाधीश आर.ए. शिवरात्री, महिलांची मालमत्ता याविषयावर ॲड. सविता शिंदे, पोटगीचे कायदे या विषयावर ॲड. लताताई जगताप, विवाह व विवाह विच्छेदन या विषयावर ॲड. शहानूर सय्यद, तसेच गटविकास अधिकारी मनोज राऊत यांची भाषणे झाली. यावेळी प्रास्ताविक न्यायाधीश उमेश देवर्षी यांनी केले. त्यानंतर नालसा थीम व एन.सी.डब्ल्यु. व्हीडीओ सादर केले. या सर्व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ॲड. डॉ. बाबूराव हिरडे यांनी केले.