करमाळ्यातील अथर्वशीर्ष पठणाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आज ५१ पैठण्यांचा लकी ड्रॉ

करमाळा : गणेशोत्सवानिमित्त करमाळा शहरातील सरकार मित्र मंडळातर्फे गेल्या पाच वर्षांपासून महिलांसाठी तीन दिवसीय सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन केले जाते. या सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाला यंदाही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षापासून मंडळाने या उपक्रमात पैठणी व गिफ्ट कुपनांचा समावेश केला असून भक्तीरसासह बक्षिसांचा आनंद महिलांना मिळत आहे.

सहभागी महिलांना पैठण्यांसोबत शालीमार गोल्ड कुपन आणि मसाला दूध यांचेही वाटप केले जाते. यावर्षी तीन दिवसांत एकूण ५१ पैठण्या व ५१ शालीमार गोल्ड कुपन्स काढण्यात येणार आहेत.

आज (शुक्रवारी दि. 5) सायंकाळी सात वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा, तहसीलदार शिल्पा ठोकडे आणि सहायक पोलीस निरीक्षक गिरीजा मस्के यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आरतीनंतर कुपनांचा लकी ड्रॉ काढण्यात येईल.
या उपक्रमासाठी अजित यादव, विश्वजीत परदेशी, दिनेश ममदापूरे, भूषण खुळे, पंकज वीर, दर्शन देवी, अभिजीत घोडेगावकर आणि श्रीकांत धुमाळ हे कार्यरत आहेत.




