करमाळा येथे ‘बालविवाह मुक्त भारत’ व ‘बालकामगार मुक्त भारत’ या अभियानाची कार्यशाळा संपन्न

करमाळा (दि.२७) – कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन अमेरिका यांच्या सहकार्याने व महात्मा फुले समाज सेवा मंडळ करमाळा यांच्या वतीने करमाळा येथील उमेद भवन येथे काल (दि.२६ ऑगस्ट) बालविवाह मुक्त भारत आणि बालकामगार मुक्त भारत या अभियानाच्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व बचत गटांच्या गट समन्वयक यांच्यासाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेला उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक श्री योगेश जगताप महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री प्रमोद झिंजाडे तालुका बाल संरक्षणाधिकारी श्री मिथुन पवार व या अभियानाचे जिल्हा समन्वयक निशिगंध गायकवाड प्रदीप साळुंखे व तालुका समन्वयक सीमा कांबळे सुजाता कांबळे व तालुक्यातील सर्व गट समन्वयक उपस्थित होत्या.

याप्रसंगी श्री योगेश जगताप यांनी प्रास्ताविक केले. बालकामगार मुक्त भारत व बालविवाह मुक्त भारत, बाल लैंगिक शोषण मुक्त भारत या अभियानाची सविस्तर माहिती महात्मा फुले समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी दिली. यावेळी बोलत असताना बालविवाह रोखण्यासाठी कोणकोणत्या शासकीय व्यवस्थेकडे तक्रार करावी व ती कसे करावे त्याचबरोबर बालकामगार आढळून आल्यास त्याची माहिती ग्राम बाल संरक्षण समिती तालुका बालक संरक्षण समिती बाल संरक्षण अधिकारी व जिल्हाधिकारी यांना मेल द्वारे तसेच त्यासंबंधीच्या तक्रार निवारण संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले. तसेच बालविवाह मुक्त गाव,बालकामगार मुक्त गाव, बाल लैंगिक शोषण मुक्त गाव करण्याबाबत महिलांनी पुढाकार घेऊन समोर येण्याचा आवाहन केले.

यावेळी तालुका बाल संरक्षण अधिकारी मिथुन पवार यांनी मार्गदर्शन करताना बालविवाह व बालकामगार या दोन्ही घटना आढळून आल्यास मला वैयक्तिक कळवा मी त्यावर कार्यवाही करेल त्याचबरोबर बालकामगार व बालविवाह कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच त्यांनी काम करत असताना येणाऱ्या अडचणी व त्यातून मार्ग कसा काढावा याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमांमध्ये बालविवाह झाल्यानंतर कोणकोणत्या समस्यांना मुलींना मुलांना समाजामध्ये सामोरे जावे लागते मानसिक त्रास कशाप्रकारे सहन करावा लागतो त्यांच्या इच्छा आकांक्षांचा कशाप्रकारे बळी दिला जातो व त्यांना या परिस्थितीतून बाहेर कसे काढता येईल व सध्या बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत यावर प्रत्येक कुटुंबामध्ये पालक व पाल्य यांच्यामध्ये सुसंवाद कसा असावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन प्रकल्पाच्या जिल्हा समन्वयक रजनीकांत गायकवाड यांनी केले.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सर्व गट समन्वयक महिलांनी आम्ही आमच्या मुलांचे व बचत गटातील इतर सदस्यांच्या मुला मुलींचे लग्न त्यांचे वय पूर्ण झाल्याशिवाय करणार नाही किंवा करू देणार नाही अशा प्रकारचे शपथ घेऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.


