करमाळा येथे मॅटवरील कुस्तीचे प्रशिक्षण केंद्र होणार सुरू

करमाळा(दि.१५) : करमाळा येथे मॅटवर खेळल्या जाणाऱ्या कुस्तीचे प्रशिक्षण केंद्र सुरु होणार असून याचे उद्घाटन उद्या दिनांक १६ फेब्रुवारी रोजी करमाळा मतदारसंघाचे आमदार नारायण पाटील व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या शुभहस्ते होणार आहे. तालुका क्रीडा संकुल (जीन मैदान) येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमास तहसीलदार शिल्पा ठोकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, तालुका क्रीडा अधिकारी तानाजी मोरे, डीवायएसपी अजित पाटील, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना क्रीडा शिक्षक सागर शिरसकर म्हणाले की, तालुका क्रीडा संकुल येथे प्रथमच मॅटवरील कुस्तीचे प्रशिक्षण केंद्र सुरू करत आहोत. या कुस्ती प्रशिक्षण केंद्रामध्ये ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन अनिल जाधव हे कुस्तीपटूंना मार्गदर्शन करणार आहेत. येथे कुस्तीपटूंना कुस्तीचे तांत्रिक धडे देऊन उत्कृष्ट कुस्तीपटू घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. विशेष म्हणजे मुलांसह मुलींना देखील या केंद्रात कुस्तीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यासह परिसरातील कुस्तीपटूंनी याचा लाभ घ्यावा.






