करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास NAAC कडून B+ ग्रेड प्राप्त
करमाळा : करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय मूल्यमापन आणि मान्यता परिषदेच्या (NAAC) मूल्यांकनामध्ये 2.71 चा प्रभावी CGPA (क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉइंट एव्हरेज) स्कोअर मिळवून B+ ग्रेड मिळवली. NAAC च्या पिअर टीम ने 29 आणि 30 सप्टेंबर 2023 रोजी संस्थेला भेट दिली होती. यावेळी विद्यालयाचे शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज आणि प्रगतीचे मूल्यांकन केले.
मागील काही वर्षांत विद्यालयाने सतत शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्टता जोपासली असून शिक्षणाबरोबरच एन. सी. सी. , एन.एस.एस. व स्पोर्टस् या विभागाच्या माध्यमातून महाविद्यालयाची गुणवत्ता राखण्याचे काम केले जात आहे. या महाविद्यालयाचे अनेक NCC चे विद्यार्थी दिल्ली मधे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी झालेले आहेत, तसेच विद्यापीठात गुणवत्तेचे सुवर्ण पदके पटकावलेली आहेत.
विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे व अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांनी संपूर्ण शैक्षणिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे, त्यांच्या समर्पण आणि अथक परिश्रमाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले. ही उल्लेखनीय कामगिरी उच्च शिक्षणाच्या विविध पैलूंमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि उच्च दर्जा राखण्यासाठी संस्थेची अटल वचनबद्धता दर्शवते.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए.एम. साळुंखे, नॅक समन्वयक प्रा.ए.पी.माने ,कनिष्ठ विभागाचे उपपाचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाशी संबंधित सर्वांनी सांघिक कार्य केल्याचा हा परिणाम असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील यांनी सांगितले.