प्रांत व तहसील कार्यालयातील अडवणूकीबाबत धरणे आंदोलनाचा युवासेनेचा इशारा
केम (संजय जाधव)- मराठा कुणबी प्रकरणासाठी सर्वसामान्यांची अडवणुक होत असून एजंटकडून येणाऱ्या प्रकरणावर डोळेझाकुन सह्या करणारे अव्वल कारकून तसेच नायब तहसीलदार सर्वसामान्यांची अडवणूक करत असल्याचा गंभीर आरोप युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी केला असून तहसिल तसेच प्रांत कार्यालयातील ऑनलाईन ऑपरेटर अधिकाऱ्यांच्या व एजंट च्या मिलीभगत लचा हा प्रकार थांबला नाही तर पुढील आठवड्यात धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी प्रांत अधिकारी व तहसिलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
दिलेल्या निवेदनात युवासेनेकडुन म्हटले आहे की करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी आजपर्यंत मराठा कुणबी प्रकरणासाठी अत्यंत गतीमान व पारदर्शक यंत्रणा राबवून अनेकांना कुणबी दाखले मिळवून देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे याबाबत वेळोवेळी युवासेनेकडुन व पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही जाहीर कौतुक देखील केले आहे .मात्र निवडणुकी पासुन कुणबी मराठा प्रकरणाचा निपटारा अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. एजंटकडूनच प्रकरणे यावीत यासाठी ऑनलाईन ऑपरेटर व प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची इच्छा असल्याने अनेक प्रकरणे दोन ते तीन महिन्यांपासून धुळखात पडलेली आहेत. प्रांत व तहसिल कार्यालयातील ऑनलाईन ऑपरेटर तसेच प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची मिलीभगत असून एजंटकडून आलेली प्रकरणे तात्काळ तहसिल व प्रांत समोर ठेवली जातात, नागरिकांनी स्वत दिलेली तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून येणारी प्रकरणे अडकवून ठेवणे ,किरकोळ कारणे देऊन माघारी पाठवणे उद्धठ भाषा वापरणे असे प्रकार घडत आहेत.
प्रांत कार्यालयात अनेक महिन्यांपासून प्रकरणे सह्यांसाठी प्रलंबित आहेत मात्र प्रांत अधिकाऱ्यांना सह्या करायला वेळ भेटत नाहीत प्रांत कार्यालयातीलच काही जण पैशांची मागणी करत आहेत. येत्या आठ दिवसांत सर्व प्रकरणे निकाली न निघाल्यास प्रांत कार्यालया विरोधात करमाळा येथे धरणे आंदोलन केले जाईल असा इशारा युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी दिला आहे.
कुणबी प्रकरणासाठी एजंटकडून अनेकांची लुट झाली आहे याबाबत करमाळा येथील सामाजिक कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी दाखल झालेल्या आहेत मात्र तरीदेखील तहसिल व प्रांत कार्यालयात एजंट लोकांचा सुळसुळाट सुरू असून तहसिल व प्रांत मधील ऑनलाईन ऑपरेटर व या एजंट मध्ये मिलीभगत असल्याने एजंटकडून गठ्ठेचे गठ्ठे सह्या केल्या जातात मात्र सामान्य लोकांची अडवणूक होत आहे हे चित्र बदलले पाहिजे.
– शंभूराजे फरतडे, युवासेना तालुकाप्रमुख, करमाळा
करमाळयातच प्रांत अधिकाऱ्यांकडून सह्या झाल्या पाहिजेत
सर्कल चौकशी, अव्वल कारकून, नायब तहसीलदार, तहसिलदार यांच्या सह्या झाल्यानंतर प्रांत कार्यालयात हि प्रकरणे जातात मात्र दर बुधवारी प्रांत अधिकारी करमाळयात येत असताना हि प्रकरणे कुर्डवाडी प्रांत कार्यालयात पाठवण्याची गरज नाही या ठिकाणीच प्रांत यांनी सह्या कराव्यात.
– मयुर तावरे, युवासेना गटप्रमुख, करमाळा