जिल्हा परिषद केंद्र शाळा केम येथे नवीन विद्यार्थ्यांचे ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढून स्वागत

केम (संजय जाधव): केम (ता.करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आले.

शाळेतील नवागत विद्यार्थ्यांची ट्रॅक्टरमधून प्रभातफेरी काढून गावातून मिरवणूक काढण्यात आली. ट्रॅक्टर व टेम्पोमध्ये विद्यार्थ्यांना बसवून, हालगीच्या तालावर, देशभक्तीपर गीते, बालगीते आणि घोषणांच्या गजरात ही मिरवणूक साजरी करण्यात आली.


शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांचे फुलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. गुलाबपुष्प, फुगे देत आणि रंगीबेरंगी सजावट करून संपूर्ण वातावरण आनंदमय करण्यात आले होते. या प्रसंगी इयत्ता 1 ली ते 5 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश आणि गोडधोड खाऊ वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच सौ. सारिकाताई कोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आण्णासाहेब तळेकर, उपाध्यक्ष पूजा धर्मराज, महेश शिंदे, नवनाथ केंगार, सागर तळेकर, सागर दोंड, आनंद शिंदे, बालाजी अवताडे आदी मान्यवर उपस्थित होते.

केम केंद्राचे केंद्रप्रमुख महेश्वर कांबळे, सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालकवर्ग आणि महिला पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.




