तालुकास्तरीय गुणवत्ता चाचणी स्पर्धेत गौंडरे जि. प. शाळा समूहगीत गायन स्पर्धेत प्रथम

करमाळा : तालुकास्तरीय विद्यार्थी गुणवत्ता शोध चाचणी (टॅलेंट हंट) समूहगीत गायन स्पर्धेत गौंडरे (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या लहान गटाने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयक गीत सादर करत निसर्ग संवर्धनाचा सुंदर संदेश दिला. या सादरीकरणात हार्मोनियमवर स्वरा खंडागळे, खंजिरीवर दीक्षा कोपनर, ढोलकीवर सुरेश चव्हाण, तबल्यावर गंगाराम माने यांनी साथ दिली, तर सरिता अंबारे, अनुष्का अंबारे, प्रज्ञेश सरवदे, राजवर्धन अंबारे, राजनंदिनी निळ, प्रांजली काळे आणि आनंदी बले यांनी उत्कृष्ठ गायन केले.

या स्पर्धेतील पर्यावरण गीत हे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय खंडागळे यांनी स्वतः लिहिले आहे. “शाळा ही फक्त पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित नसून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी आणि जीवनात आनंद भरणारी असते,” हे या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे.

या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. गाडे, संगीत शिक्षक श्री.खांडेकर, श्री. घाडगे आणि श्री. हनपूडे तसेच सर्व पालक वर्ग यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
गुणवत्ता शोध चाचणी (टॅलेंट हंट) हा शासनाचा उपक्रम असून, या स्पर्धेचे आयोजन करमाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेमध्ये करण्यात आले होते.



