येणाऱ्या निवडणूका ईव्हीएम ऐवजी मतदान पत्रिकेचा वापर करून पार पाडाव्यात – झिंजाडे यांचे सर्व सरपंचांना आवाहन

0
Pramod Zinjade

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – देशातील सर्व ग्रामपंचायतींनी येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणूका ईव्हीएम ऐवजी मतदान पत्रिकेचा वापर करून पार पाडाव्यात असा ठराव ग्रामपंचायतीत करून तो ठराव मंजूर करून तो केंद्र व राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवाव्या अशा प्रकारचे आवाहन करमाळा येथील महात्मा फुले समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी भारतातील सर्व सरपंचांना प्रेस नोटीस द्वारा केले आहे.

या विषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, आज आपला देश अतिशय कठीण काळातून जात असून, भारताच्या संविधानातील मानवतावादाची जगमान्य मूल्यांचा आणि देशातील लोकशाही, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि देशाची एकात्मतेला तडे जातील की काय, अशी भीती प्रत्येक संवेदनशील आणि संविधानप्रेमी नागरिकाला वाटणे स्वाभाविक आहे. अशा अवघड आणि कसोटीच्या परिस्थितीमध्ये, लोकप्रतिनिधी म्हणून समाजविकासाच्या क्षेत्रात कार्यरत असणा-या सर्वांवराच मोठी जबाबदारी आलेली आहे.या पार्श्वभूमीवर २०२४ मध्ये होणा-या लोकसभेच्या आणि त्याबरोबर व त्यानंतर होणा-या विधानसभेच्या निवडणुका फार महत्त्वाच्या ठरणार आहे. सद्याच्या राजकीय परिस्थिती व केंद्र सरकारचा कारभार पाहता, देशातील लोकशाही टिकेल की नाही अशी चिंता माझ्यासारख्या भारतीय संवैधानिक मूल्यांवर निष्ठा असणा-या सामाजिक कार्यकर्त्यास वाटू लागली आहे.

निवडणुका या लोकशाहीचे एक महत्त्वाचे अंग असून, आपल्या देशातील मतदारांची अवाढव्य संख्या लक्षात घेता, २००४ मध्ये संपूर्ण देशात ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) चा वापर करून लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. मात्र विविध ठिकाणचे अनुभव लक्षात घेता ईव्हीएम बाबत मतदारांच्या मनात सर्वत्र संशय व नाराजी असल्याचे विशेषतः मागील दहा वर्षांत आढळून आले आहे. ईव्हीएमच्या तंत्रज्ञानाच्या रचनेत बदल करणे सहज शक्य असून, त्यामुळे आपलं मत कोणा इतर उमेदवाराला टाकले तरी ते मत सत्ताधारी पक्षाच्याच उमेदवारांकडे वळवता येते, याची असंख्य उदाहरणे देशभरातील ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांमध्ये आढळून आले असून, त्याविरूद्ध संबंधितांनी दाद मागून सुद्धा कोणतीही कारवाई झाली नसल्याचे सर्रास दिसून आले आहे.

हा सारा गैरप्रकार पाहता, ईव्हीएमद्वारा मतदान घेणे म्हणजे जनतेची, मतदारांची फसवणूक असून, ते लोकशाहीला फार घातक आहे. ईव्हीएमने मतदान घेणे हा एक फार्स ठरू शकतो. आणि म्हणूनच, मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण आपल्या ग्रामपंचायतींच्या बैठकीत आयत्या वेळचा विषय म्हणून ईव्हीएम ऐवजी मतदान पत्रिकेचा वापर करूनच यापुढील सर्व निवडणुका घेण्यात याव्यात, असा रीतसर ठराव करून तो राज्य व केंद्रातील निवडणूक आयोगाकडे पाठवावा व देशातील लोकशाही वाचविण्याच्या कार्यात सहभागी होऊयात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!