विधवा प्रथा निर्मूलनासाठी झिंजाडे यांची देशव्यापी मोहीम : खासदार, केंद्रीय मंत्र्यांना लक्ष घालण्याची केली मागणी

करमाळा (दि. 12): विधवा प्रथा निर्मूलन मोहिमेला महाराष्ट्रात चालना देणारे प्रमोद झिंजाडे यांचे कार्य अविरतपणे सुरु असून त्यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहाटकर आणि सर्व लोकसभा खासदारांना पत्र लिहून या रुढींचा ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बंदोबस्त करण्याचे आवाहन केले आहे.

करमाळा येथील महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष असलेल्या प्रमोद झिंजाडे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, आजही अनेक भागांत विधवांवर अमानवी प्रथा लादल्या जातात – त्यांचे मंगळसूत्र तोडले जाते, बांगड्या आणि पैंजण काढले जातात, सणासुदीला व शुभकार्यात त्यांना सहभागी केले जातं नाही, यासारख्या अनेक प्रकारच्या अमानवीय रूढी परंपरा आहेत.

झिंजाडे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे (NCW) अशी विनंती केली आहे की, त्यांनी महिला व बालविकास मंत्रालयाला निर्देश द्यावेत की देशभरातील सर्व राज्य सरकारांनी गावागावात विधवा प्रथांचे उच्चाटन करण्यासाठी विशेष समित्या गठीत कराव्यात.

झिंजाडे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील 7,000 हून अधिक गावांनी विधवा प्रथांविरुद्ध ठराव पारित केले, ज्यामुळे विधवांना सामाजिक सन्मान आणि स्वातंत्र्य मिळाले. या यशस्वी मॉडेलची दखल आंतरराष्ट्रीय माध्यमांनी घेतली. इतर देशांमधील सामाजिक कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर अशा प्रथा संपवण्यासाठी ग्रामसभांचा वापर करण्याची प्रेरणा मिळाली.

या अभियानामुळे विधवा महिलांना सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील काही गावांमध्ये ग्रामपंचायतींनी आपल्या निधीचा 15% हिस्सा विधवांच्या कल्याणासाठी वापरण्यास सुरुवात केली. ही माहिती जागतिक स्तरावर सामाजिक न्याय आणि आर्थिक समावेशनाच्या चर्चेत समाविष्ट झाली आहे, ज्यामुळे इतर देशांमध्येही अशा उपाययोजनांचा विचार होऊ लागला आहे.


