करमाळा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या - आमदार नारायण पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी - Saptahik Sandesh

करमाळा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या – आमदार नारायण पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेली गंभीर परिस्थिती आणि शेतकऱ्यांवर आलेले संकट…

केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेली गंभीर परिस्थिती आणि शेतकऱ्यांवर आलेले संकट लक्षात घेऊन आमदार नारायण पाटील यांनी जिल्हाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन यांची भेट घेऊन करमाळा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली. तसेच शेतकऱ्यांना कोणत्याही अटी न लावता सरसकट शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

तालुक्यात अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पिके करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना तातडीने सरसकट शासकीय मदत देण्यात यावी, अशी ठाम भूमिका आमदार पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली.

दरम्यान, तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात गंभीर होऊ नये, यासाठी दहिगाव उपसा सिंचन योजना अविरत सुरू ठेवावी, अशी मागणीही आमदार नारायण पाटील यांनी केली.

या मागण्यांवर जिल्हाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आमदार पाटील यांच्याकडून सांगण्यात आले. करमाळा तालुक्यातील पावसाची स्थिती आणि निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती याबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी योग्य तो अहवाल शासन दरबारी पाठविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!