निष्काम कर्मयोगी - संतश्रेष्ठ गाडगे महाराज - Saptahik Sandesh

निष्काम कर्मयोगी – संतश्रेष्ठ गाडगे महाराज

0

महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे हे आपण जाणतोच त्यातील बहुतेक संतांच कार्य देवभक्ती, दर्शन,कथा ‘प्रवचने ‘ यावर चालत होते. परंतु संत गाडगे महाराज यांच कार्य हे वास्तव जीवनाशी सुसंगत आणि धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक अशा महत्वाच्या मूलभूत गोष्टींशी संबंधित होते.

दैवी चमत्कार, खोट्या कल्पनांवर आधारित तत्कालीन पुरोहित वर्गाने केलेली समाजाची आणि धर्माची ठेवण हे गाडगेबाबा यांच्या साधक अवस्थेतील जागृत कर्मयोग्याला मुळीच पटणारे नव्हते. मानवजातीच्या कल्याणासाठी सेवा-धर्माची प्राणप्रतिष्ठा गाडगेबाबांनी केलेली होती. मोठमोठ्या शहरांपासून ते ५-१० झोपड्यांच्या कानाकोपऱ्यातल्या खेड्यांपर्यंत सर्वत्र भटकंती करीत असताना त्यांची समाज जीवनाची बारीक सुक्ष्म टेहळणी सारखी चालली होती.

अत्यंत मागासलेल्या शेतकरी खेडूती समाजात २३ फेब्रुवारी १८७६ रोजी शेणगाव,जि.अमरावती येथे त्यांचा जन्म झाला होता. त्या समाजाच्या आणि एकूणच महाराष्ट्रातील सामान्यजनांच्या मानसिक, शारिरीक, आर्थिक, सर्व हालापेष्टांचा त्यांना पुरा अनुभव होता. रक्त थिजून हाडे पिचेपर्यंत शेताची माती तिंबवली तरी सुखाचा घास तोंडात पडत नाही.वरिष्ठ वर्गाची गुलामगिरी पिढ्यानपिढ्या अखंड चालूच , देवाधर्माच्या आणि रुढीच्या नावावर जागोजाग पशु-पक्षांची हत्या बेगुमान चाललेली. गरिबानी मरावे नि श्रीमंतांनी मनमुराद चरावे हा समाजव्यवस्थेचा दण्डक. गरिबांना जीवन सुधारण्याची महत्वाकांक्षा नाही, निरक्षर अडाणी म्हणून आस्ति-नास्ति विचार करण्याची अकलेला सवय नाही. महार मांगादि जमातींनी इतरांपासून दूर का रहावे ? कुष्ठरोगी, वेडे,लुळेपांगळे यांची समाजाने कसलीही दाद का घेऊ नये ? देव देवळांचा जागोजाग एवढा ऐश्वर्याचा बडेजाव चालला असतानाही गोरगरिबांच्या तोंडात वर्षातून एकदाही कोणी साखरेची चिमूट,गुळाचा खडा, किंवा तुपाचा थेंब का घालू नये ? यात्रेच्या ठिकाणी भिक्षूक बडव्यांचा मनस्वी त्रास जाच सोसून लाखो लोक मेंढरासारखे का जातात ? अशा शेकडो प्रश्नांचे डेबूजी आपल्या मनाशी चिंतन करीत असे.लोकांचे कुठे काय चुकते ? त्यांना कोण कसे नि का चुकवते ? काय केले असता अडाणी नि भोळा बहुजनसमाज जागा होऊन आपल्या शेकडो ठकवणींच्या कर्ता-कर्म- क्रियापदांचा शोध आणि बोध घेईल ? हे एकच विचारांचे चक्र त्यांच्या मस्तकात भिरभिरत असायचे.

तत्कालीन समाजात तेव्हा बुवा-बाबा कथा, किर्तन, पुराण, भजने, करायचे परंतु त्यातील गूढ अध्यात्म त्या बुवांनाच किती समजत असेल हा प्रश्नच होता आणि सामान्य जनता त्या दगडांच्या मूर्ती भोवती भक्तीच्या रंगात आंधळी होऊन तल्लीन होत असायची.भजने किर्तने त्यावेळी गावोगावी असायचीच परंतु त्या रसाळ भजनांनी लोकांत देवभोळेपणा,भिक्षूक बडव्यांचा वरचढपणा,भलभलत्या दान दक्षिणांचे प्रघात, इहलोकाविषयी नि स्वतःविषयी तिटकारा, आणि परलोकाच्या प्राप्तीसाठी काळीजतोड विवंचना अशा थोतांड गोष्टी वाढत गेल्या होत्या. अशा काळात संत गाडगे महाराज नावाचा सत्पुरुष कर्मयोगी जन्माला येतो आणि परंपरेच्या ठराविक चाकोरीबाहेरचे, नव्या विचारांचे तत्वज्ञान, बहुजन समाजाच्या गळी उतरवतो हे कठीण कर्म मोठमोठ्या धर्म- पंथ संस्थापकांना जमले नाही ते गाडगे महाराजांनी केले.

देव म्हणजे काय ? याविषयी गाडगेबाबा काही संतांची उदाहरणे देऊन म्हणत असत की माझ्यासारख्या अडाणी खेडवळाला कस बर ते सांगता येणार ? पण माझ्या इवल्याशा बुध्दीप्रमाणे सांगतो हे सगळं जग निर्माण करणारी आणि सुरळीत ठेवणारी एखादी महाशक्ती असावी असं ते म्हणत. गाडगे महाराजांना आत्यंतिक भूतदया होती. वाटेत कुणी अडचणीत दिसला की त्याच्या मदतीला ते धावून जात.दुसऱ्याच्या डोक्यावरचे ओझे स्वतः वाहत,बैल किंवा गाय म्हातारी झाल्यावर निरोपयोगी जनावरं म्हणून खुशाल उघड्या बाजारात कसायाला विकण्याचा धंदा त्यावेळीही फार चाले.ज्या गोमातेने जन्मभर दूध देऊन तुमची नि तुमच्या पोराबाळांची पोटं भरली तुमची हाड सकस बलवान केली,शेतीला तगडे बैल दिले,शेणखत दिले ती आता म्हातारी झाली म्हणून तुम्हाला पोसवत नाही काय ? काय तुम्ही माणसं का भूत ? तुम्हाला कोणी म्हातारपणी असंच विकल अथवा उकीरड्यावर टाकून दिलं तर बरं वाटल का तुमच्या मनाला ? असे उपदेश देऊन गाडगेबाबा गोविक्रीचा नंगानाच हाणून पाडायचे.

अनेक ठिकाणी खेडूती समाजात मरीआई,जरीआई,खंडोबा,म्हसोबा इत्यादी गावठी देवता असत आणि त्यांच्या नावावर कोंबड्या,बकऱ्यांचे नैवेद्य करुन स्वतःच्या जिभेचे चोचले जसे आज पोसले जातात तसेच ते तेव्हाही मोठ्या प्रमाणावर चाले.अशा गोष्टींना मोठ्या प्रमाणावर पायबंध घालण्याचे काम गाडगेबाबांनी आपल्या आचरणातून नि किर्तनातून केलेले ठळकपणे दिसते.सावकारी पाशातून बहुजन समाजाची मुक्तता करण्यासाठी ते आपल्या प्रबोधनात्मक वाणीतून वारंवार जागृती करत असतं की,कर्ज काढून लग्न करु नका,हुंडा देऊ-घेऊ नका,सण साजरा करण्यासाठी स्वतःचा खोटा बडेजाव दाखवण्यासाठी स्वतःच्या घामावर नि कष्टावर पोसलेली, मातीतून सोनं काढणारी धान्याची शेती सावकाराच्या दारात गहाण ठेवू नका असे प्रबोधनाचे विचार मांडून लोकांना , मुलांना शिक्षण घेण्यासाठी स्वतः मधे सुधारणा घडविण्यासाठी ते त्यांना सत्यशोधकी विचारांचे बाळकडू देऊन शिक्षणाचाही तेवढ्याच हिमतीने,तर्कबुध्दीने, प्रचार प्रसार करत होते.

तसेच गाडगे महाराज स्वच्छतेच्या बाबतीतही निरक्षर असूनही साक्षरांच्या वरचढ होते ज्या गावी जात तेथील विहिरी सभोवतालचा परिसर, इतर गावांतील परिसर स्वत हातात खराटा घेऊन अगदी स्वच्छ करीत असत हा त्यांचा खराट्याचा धर्म स्वच्छतेचा कानमंत्र देत गावोगावी प्रसिद्ध झाला होता. | जोडोनिया धन उत्तम वेव्हारें |उदास विचारे वेंच करी | हेच बाबांच्या किर्तनाचे थोडक्यात सार सांगता येईल.वारकरी पंथाने देव, देवळे दान,दक्षिणा ब्राह्मण भोजनादि पोटभरू व्यापारात लोकांच्या श्रध्दाळू भावनांचा जो दुरुपयोग चालवला होता, त्याला गाडगेबाबांच्या किर्तनांनी आता पुष्कळच पायबंद ठोकला होता.गाडगेबाबा दगडाच्या मूर्तीत देव शोधत नव्हते ते माणसात देव बघत.गाडगे बाबांची कीर्तने लक्षपूर्वक ऐकली तर हा माणूस मूर्तीपूजेपेक्षा मानवातील मानव्यरुपी परमेश्वरावरच श्रध्दा ठेवणारा होता हे चटदिशी पटते.

गाडगे बाबांनी नाशिक, पंढरपूर, आळंदी, देहू, इत्यादी ठिकाणी मोठमोठ्या धर्मशाळा बांधल्या नि अन्नसत्रे चालू केली पण त्यांनी तिथल्या क्षेत्रीय देवदेवतांचे क्वचितच कधी दर्शन घेतले असेल.ही असते खऱ्या अध्यात्माची ताकत जी दगडाच्या मूर्तीभोवती भक्तीत कधी आंधळी होत नाही,जी खऱ्या रंजल्या – गांजलेल्यांची सेवा करण्याची प्रेरणा देते आणि स्वतःच्या आतील शक्तीला प्रज्वलित करते हेच खरे अध्यात्म गाडगे महाराजांच्या रुपाने अनुभवण्यास मिळते.महाराष्ट्राच्या या पावनभूमीत संतश्रेष्ठ गाडगे महाराजांसारखा अलौकिक महापुरुष जन्माला आला हे महाराष्ट्राचे परमभाग्यच म्हणावे गाडगे महाराजांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन…!

✍️ समाधान दणाने -करमाळा जिल्हा-सोलापूर-७२१८८४४६५२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!