कुर्डूवाडीतील १३ नगरसेवकांनी दिला दिग्विजय बागल यांना जाहीर पाठिंबा
करमाळा (दि.१०) – करमाळा मतदारसंघामध्ये रोज वेगवेगळ्या घडामोडी घडत असून विविध राजकिय नेते, छोटे-मोठे राजकिय गट या-ना त्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याने यंदाची करमाळा मतदारसंघांची विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली आहे.
नुकतेच शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्डूवाडीतील १३ नगरसेवकांनी महायुतीचे उमेदवार दिग्विजय दिगंबरराव बागल यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा आणण्यासाठी दिग्विजय बागल यांना ३६ गावातुन जास्तीत जास्त मताधिक्य देऊ असा विश्वास शिवाजीराव सावंत यांनी व्यक्त केला.
सुरुवातीला ही निवडणूक प्रामुख्याने महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील व अपक्ष उमेदवार विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्यातच असल्याचे वातावरण निर्माण झाले होते. उमेदवारी देण्याच्या अखेरच्या क्षणी दिग्विजय बागल यांना महायुतीकडून शिवसेना पक्षाकडून उमेदवारी मिळाल्याने दिग्विजय बागल यांचे पारडे जड झाले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी देखील आपली पूर्ण ताकद बागल यांच्या पाठीशी लावली आहे. विविध गावोगावी सभा, कॉर्नर सभा, पदयात्रा, मतदार भेटी यामधून त्यांनी करमाळा मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहोचुन आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.
नुकतीच ८ नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची करमाळा येथे सभा झाल्यानंतर त्यांच्या गटाला एक वेगळीच उभारी मिळालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपण दिग्विजय यांच्या पाठीशी असल्याचे सांगितल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण झाला आहे. यातूनच विविध छोटे-मोठे गट बागल गटामध्ये सामील होत आहेत. शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्डूवाडीतील १३ नगरसेवकांनी बागल यांना पाठिंबा दिल्याने छत्तीसगावा मधून देखील दिग्विजय बागल यांना निवडणुकीत चांगले मत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
यावेळी शिवाजीराव सावंत, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष – रश्मी दीदी बागल – कोलते, प्रमुख पदाधिकारी आणि मतदासंघांतील कार्यकर्ते उपस्थित होते.