राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी अमरजित साळुंखे यांची निवड -

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी अमरजित साळुंखे यांची निवड

0
श्री. साळुंखे यांच्या निवडीनंतर सत्कार करताना आमदार नारायण पाटील व जेउरचे सरपंच पृथ्वीराज पाटील

करमाळा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी अमरजित साळुंखे यांची निवड प्रदेश कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. ही निवड प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांनी केली. त्यांच्या आधी संतोष वारे हे पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते.

साळुंखे हे सातोली (ता. करमाळा) येथील शेतकरी कुटुंबातील असून माजी उपसभापती शंकरराव साळुंखे यांचा वारसा त्यांना लाभलेला आहे. ते कृषी पदवीधर असून करमाळा तालुक्यात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सतत आघाडीवर आहेत. सर्वोदय प्रतिष्ठानचे सचिव, शिवरत्न ग्रामीण संस्थेचे अध्यक्ष, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि भाजपाचे तालुका सरचिटणीस म्हणून त्यांनी कार्य केले आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप सोडून त्यांनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. मोहिते पाटील परिवारातील विश्वासू कार्यकर्ते म्हणून साळुंखे यांची ओळख आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदार नारायण पाटील यांच्यासोबत सक्रिय काम केले होते.

साळुंखे यांच्या निवडीबद्दल माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार नारायण पाटील, जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख आणि कार्याध्यक्ष रविंद्र पाटील यांनी अभिनंदन केले. निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!