आदिनाथ वाचविण्याचे श्रेय बागल अथवा पाटील गटाने घेणे हास्यास्पद-अतुल खूपसे-पाटील
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना पवार कंपनीच्या जवळजवळ घशात गेलाच होता. मात्र वेळीच शिवाजीराव सावंत व तानाजीराव सावंत हे सावंत बंधू शेतकऱ्यांच्या हितासाठी धावून आले. शेतकऱ्यांचे आणि कामगारांचं हे मंदिर अबाधित रहावं याचे श्रेय सावंत बंधूंना जाते. यापुढे देखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज राहिले तर तो सुरळीत राहील. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उगीचच राजकीय स्टंटबाजी करत बागल अथवा पाटील गटाचा श्रेय घेण्याचा खटाटोप हास्यास्पद वाटतो,असा टोला जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे-पाटील यांनी लगावला.
आयोजित पत्रकार परिषदेत पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रा. शिवाजीराव सावंत यांनी ग्राउंड लेव्हल वरची धुरा सांभाळली तर मंत्री तानाजीराव सावंत यांनी मंत्रालयीन बाजू सांभाळली आणि म्हणूनच कारखान्याचे धुराडं खऱ्या अर्थाने पेटलं. याचं सर्व श्रेय फक्त सावंत बंधूंना जातं. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणीही कारखान्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. आदिनाथ कारखान्याच्या निर्मितीसाठी स्व.गोविंदबापू पाटील यांनी मोठा त्याग केला होता. हे तालुक्यातील जनतेला सर्वश्रुत आहे. त्यानंतर कारखान्याची सत्ता ‘या’ अथवा ‘त्या’ गटाच्या ताब्यात गेली खरी. मात्र कारखाना कोणालाच व्यवस्थितरित्या चालवणे जमले नाही. ‘कुत्र्यानं पोत फाडावं’ अशीच अवस्था कारखान्याची झाली होती. यामुळे टपून बसलेल्या पवार कंपनीने कारखाना स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून मोठा जनआक्रोश पाहायला मिळाला. केवळ शेतकऱ्याचा मंदिर वाचावं यासाठी कोणतीही राजकीय महत्त्वकांक्षा न बाळगता, स्वतःचा मतदारसंघ नसताना देखील शेतकरी व कामगारांच्या हितासाठी त्यावेळी मंत्री तानाजीराव सावंत यांनी कराराचे एक कोटी रुपये भरले, तर त्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून ९ कोटी रुपये उपलब्ध केले. आणि कारखाना सुरळीत सुरू झाला. कारखान्याची मोळी टाकण्यासाठी दस्तूरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
यावेळी गणेश वायभसे,राणा वाघमारे, अतुल राऊत, रामराजे डोलारे, बालाजी तरंगे, अभिषेक राऊत, मंगेश बदे, हनुमंत कानतोडे, गणेश वायभासे, शरद एकाड, पांडुरंग भासले, अजिज शेख, भाऊसाहेब जाधव, शहाजी रिटे, साहेबराव विटकर, नवनाथ ढेरे, अविनाश महाराज कोडलिंगे, अभिजीत नवले,वैभव मस्के, बंडु शिंदे आदी उपस्थित होते.