शेतकऱ्यांचा सातबारा कोरा न झाल्यास भाजपचा बॅलेट पेपर कोरा होणार - बच्चू कडू -

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा न झाल्यास भाजपचा बॅलेट पेपर कोरा होणार – बच्चू कडू

0

केम(संजय जाधव): भर पावसातही हजारो शेतकरी उपस्थित राहिलेल्या केम येथील सभेत प्रहार संघटनेचे नेते बच्चु कडू यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, अन्यथा शेतकरी भाजपाचा बॅलेट पेपर कोरा करेल,” असा इशारा देत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला.

बच्चू कडू यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे :

भव्य मिरवणुकीतून सभेला सुरुवात
केम गावात बच्चुभाऊ कडू यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात झाली.



पावसातही शेतकऱ्यांची मोठी गर्दी
भर पावसातही शेतकरी सभेला उपस्थित राहिले. पावसामुळे थेट भाषणालाच सुरुवात झाली आणि वातावरणात उत्साह होता.

फडणवीसांवर थेट टीका
भाषणात कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला. विधानसभेच्या काळात दिलेले “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा” करण्याचे आश्वासन आजही अपूर्ण असल्याचे ते म्हणाले. कर्जमाफी न झाल्यास शेतकरी भाजपाचा बॅलेट पेपर कोरा करतील, असा इशारा त्यांनी दिला.

मोदींवर आरोप – कापूस उत्पादकांची फसवणूक
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोदींनी फसवले, असे कडू म्हणाले. “आपल्या कापसाचे कापड अमेरिकेत पाठवू” असे आश्वासन देण्यात आले; पण प्रत्यक्षात अमेरिकन कापूस भारतात येऊ लागला आणि शेतकरी अडचणीत आले, अशी टीका त्यांनी केली.

जातीय राजकारणाला विरोध
“मतदान करताना जातपात न पाहता शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या नेत्याला मत द्या,” असे आवाहन कडू यांनी सभेतून केले.

करमाळा तालुक्यातील प्रश्नांवर भाष्य
रिटेवाडी उपसा सिंचन योजना, ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे दर न दिल्यास कारखान्यांविरोधात आंदोलन, उजनी धरण परिसरातील वडशिवने तलाव-उपसा सिंचन योजना, तसेच करमाळा तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था आणि राष्ट्रीयकृत बँकांची सक्तीची वसुली यावरही त्यांनी संताप व्यक्त केला.

नागपूर मोर्चाची घोषणा
२८ ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, “सातबारा कोरा झाल्याशिवाय मागे हटणार नाही,” असा निर्धार कडू यांनी व्यक्त केला. या मोर्चासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने नागपूरला उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

सभेला प्रहार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ, जिल्हा संपर्कप्रमुख अमोल जगदाळे, शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील प्रहार जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे, शहर कार्याध्यक्ष खालीद मणियार, बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम, प्रहार करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर अमर साळुंखे, लक्ष्मण माने, स्थानिक नेते, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!