करमाळ्यात घाणीचे साम्राज्य – उपाययोजना न झाल्यास नगरपालिकेसमोर गाळ फेकणार : शहराध्यक्ष सुजय जगताप..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, करमाळा नगरपालिका प्रशासन याकडे दूर्लक्ष करत आहे, येत्या पंधरा दिवसांत कारवाई न झाल्यास काँग्रेस पक्षाच्यावतीने नगरपालिकेसमोर गाळ फेकण्यात येईल असा इशाऱ्याचे निवेदन काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष सुजय जगताप यांनी मुख्याधिकारी यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, करमाळा शहरास कोणी वाली राहीला नसून, जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य झाले आहे, विविध भागातील गटारी तूंबल्या आहेत, कचरा रस्त्यावर येत आहे, घाणीचे ढिग जागोजागी दिसून येतात, त्यामूळे सर्वत्र डास व रोगराई पसरण्यास सुरूवात झाली आहे.
काही ठिकाण चे पेव्हिंग ब्लाॅक उचकटून पडले आहेत. त्यात पाणी साचते त्यामुळे चालताही येत नाही. यावर पंधरा दिवसांच्या आत उपाययोजना न झाल्यास शहरातील घाण नगरपालिकेसमोर आणून टाकली जाईल व यांस करमाळा नगरपालिका जबाबदार राहील असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. सदर निवेदनाच्या प्रति पोलिस निरिक्षक व तहसिलदार यांना दिल्या आहे.