जनतेच प्रेम पाहून अत्यंत भारावून गेलो – दिग्विजय बागल
करमाळा (दि.१९) – महायुती शिवसेनेचे उमेदवार दिग्विजय बागल यांच्या प्रचारार्थ काल (दि.१८) पूर्ण करमाळा मतदारसंघात मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमधील तरुणांचा जल्लोष आणि घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. या मोटारसायकल रॅलीला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि जनतेच प्रेम पाहून अत्यंत भारावून गेलो असल्याचे मत दिग्विजय बागल यांनी व्यक्त केले.
या रॅलीची सुरुवात करमाळा येथील बागल निवास पासून सुरू झाली.ही रॅली पुढे दत्त मंदिर, संगम चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, देवीचा माळ, पांडे, सालसे मार्गे, कुर्डुवाडी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कुर्डुवाडी, बार्शी नाका, बायपास मार्ग, टोल नाका येथून यू टर्न घेऊन माढा रोड, नगरपंचायत, पटेल चौक, जनता बँक, एसटी स्टँड मागून, संभाजी चौक, संकेत मंगल कार्यालय, टेंभुणी रोड वरून, गावदेवी बालोहान, स्टेशन चौक, येथे समारोप झाला.
या रॅलीबाबत बोलताना दिग्विजय बागल म्हणाले की, या रॅलीत सहभागी होताना मला महाविद्यालयीन काळातला जल्लोष पुन्हा अनुभवता आला. साऱ्या कार्यकर्त्यांसोबत जाताना नव्याने मिळालेली अखंड ऊर्जा भविष्यात कितीतरी काळ पुरेल इतकी आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विजयासाठीची आस स्पष्टपणे दिसत होती. याप्रसंगी सर्वच मतदारांना महायुती सरकारला पुन्हा सत्तेत आणण्याचं आवाहन केलं. त्यासाठी माझ्या पाठीशी राहावं अशी साद घातली. तसेच येत्या २० तारखेला धनुष्यबाणा समोरील बटन दाबून शिवसेना – महायुतीला विजयी करा, असे आवाहन केले.
या रॅलीत करमाळा तालुक्यातील बागल गटाचे सदस्य, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.