शिक्षक मतदारसंघांसाठी पात्र मतदारांनी ६ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी पूर्ण करावी – चिवटे

करमाळा: विधानपरिषदेसाठी पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये (पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याचे काम सुरू असून, पात्र मतदारांनी ६ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे मार्गदर्शक तथा शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे.

मतदार नोंदणीसाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीने दि. 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत नमुना 19 मध्ये आपला अर्ज सादर करावा. भारत निवडणूक आयोगाकडून या नोंदणीसाठी ऑफलाईनसोबतच ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून, इच्छुक मतदारांना खालील वेबसाइटवर नोंदणी करता येणार आहे. वेबसाईट लिंक : https://mahaelection.gov.in/Citizen/Login

पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी १ नोव्हेंबर २०२५ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. यानुसार २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी पुणे विभागातील मतदार याद्या (डी-नोव्हो) नव्याने तयार केल्या जाणार आहेत. संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कार्यरत असून, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तहसीलदारांकडून नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.
शिक्षक मतदारसंघातील पात्र मतदारांनी लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी आपले नाव मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करावे, असे आवाहन महायुतीचे संभाव्य उमेदवार मंगेश चिवटे यांनी केले आहे.

महायुतीचे संभाव्य उमेदवार म्हणून चिवटे यांची तयारी सुरू
पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी गेल्या एक वर्षापासून महायुतीचे संभाव्य उमेदवार म्हणून तयारी सुरू केली आहे. सोलापूर , सांगली , कोल्हापूर येथे एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीने शिक्षक मेळावे घेण्यात आले आहेत. एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब अडसूळ यांच्या माध्यमातून गेल्या महिन्याभरापासून शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिक्षक मतदार नोंदणीची प्रक्रिया राबवत आहेत.

शिक्षकांच्या आरोग्याचा प्रश्न व उपचाराची बिले काढण्यासाठी शिक्षकांना प्रचंड मानसिक त्रास होतो. यामुळे या निवडणुकीपूर्वी राज्यातील सर्व शिक्षकांना कॅशलेस विमा योजना लागू करणार असे सांगत मंगेश चिवटे पुणे शिक्षक विभागातून आपला उमेदवारीचा प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे.
दुसरीकडे, टप्पा वाढ संदर्भात आझाद मैदान येथे नुकत्याच झालेल्या आंदोलनात सरकार आणि आंदोलक आणि शिक्षक संघटना यांच्यात मंगेश चिवटेंनी यशस्वी मध्यस्थीची भूमिका पार पाडत शिक्षकांना टप्पा अनुदान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.



 
                       
                      