माजी आमदार जगताप यांचे पाठोपाठ सावंत गटाचाही पाटील यांना पाठींबा – पाटील गट खुश तर शिंदे गट नाखुश
करमाळा (ता. ४) : माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण (आबा) पाटील यांना पाठींबा जाहीर केल्यानंतर करमाळा शहरातील सावंत गटानेही आज (ता. ४) पत्रकार परिषद घेऊन श्री. पाटील यांना पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे शिंदे गटाला धक्का बसला असून, पाटील गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांना सन २०१४ मध्ये सर्वात प्रथम सावंत गटाचे नेते कै.सुभाष (आण्णा) सावंत यांनी पाठींबा देऊन निवडणूक लढविण्यास प्रोत्साहीत केले होते. त्यानंतर सन २०१९ मध्येही सावंत गटाने आमदार शिंदे यांचे सोबत काम केले होते. श्री. शिंदे यांनी आमदार झाल्यानंतर तालुकावासियांना विश्वासात न घेता भाजपाचे फडणवीस यांना पाठींबा दिल्याने सावंत गटात नाराजी होती. सावंत गटाची कारकिर्द ही महाविकास आघाडीच्या विचाराची आहे. अशा स्थितीत आमदार शिंदे यांनी भाजपा पुरस्कृत सरकारला पाठींबा दिल्याने तात्वीक मतभेद निर्माण झाले होते. याबरोबरच तालुक्यातील विकासकामाची आकडेवारी मोठी सांगितली जाते, परंतु प्रत्यक्षात अशी कामे झाली नाहीत. असाही आक्षेप सावंत गटाचा आहे. त्यामुळे आज पत्रकार परिषद घेत सावंत गटाचे युवा नेते सुनील सावंत, पंचायत समितीचे माजी सदस्य अॅड. राहुल सावंत, माजी नगरसेवक संजय सावंत यांनी आमदार शिंदे यांचे ऐवजी महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण (आबा) पाटील यांना पाठींबा देत असल्याचे जाहीर केले. याबाबत उद्याच (ता.५) नालबंद मंगल कार्यालयात प्रचार सभा होणार असल्याचेही सुनील सावंत यांनी सांगितले आहे.
निवडणुकीच्या प्रचाराचा आरंभ होण्यापूर्वीच आमदार शिंदे यांना एका पाठोपाठ एक असे दोन धक्के बसले आहेत. माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा गट संपूर्ण तालुक्यात आहे तर सावंत गट यांचे कार्य पांडे गट तसेच करमाळा शहरात आहे. सावंत गटाचा पाठींबा पाटील गटाला मिळाल्याने पाटील गटातील कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुळतः महाविकास आघाडीस पोषक वातावरण आहे, त्यातच जगताप गट व सावंत गटाचा पाठींबा मिळाल्याने पाटील गटाच्या प्रचारात रंगत वाढणार आहे तर यशाच्या दृष्टीनेही ही बाब महत्वाची ठरणार आहे.