वाशिंबे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रस्ताव करण्याचे आरोग्य मंत्र्यांनी खात्याला दिले आदेश – महेश चिवटे
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण आरोग्य रुग्णालयात रूपांतरित झाल्यामुळे जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंबे (ता.करमाळा) येथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी आरोग्य खात्याला दिले आहे अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली. वाशिंबे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मागणी केली होती.
वाशिंबे गावापासून दहा ते पंधरा किलोमीटर परिसरात कोणताही सरकारी दवाखाना नव्हता भागातील जवळपास २५ ते ३० हजार लोकसंख्येला उपचार घेणे साठी करमाळ्याला ३० किलोमीटर यावे लागत होते ऊस तोडणीच्या काळात तोडणी कामगार व त्यांच्या लहान मुलांना होणारे आजार व त्यावर उपचार करण्यासाठी प्रचंड अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामस्थांनी वाशिंबे येथेच रुग्णालय व्हावे अशी मागणी केली होती. काल(दि.१) मुंबई येथे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांची भेट घेऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी उपकेंद्र वाशिंबेलाच द्यावी अशी मागणी केली. यावर तात्काळ आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी हे उपकेंद्र वाशिंबे येथे उभा करण्यास मान्यता देऊन आरोग्य खात्याला आदेश दिले आहेत.
वाशिंबे गावाला आरोग्य केंद्राची नितांत गरज होती ही गरज ओळखून आम्ही गावकऱ्यांच्या वतीने जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्याकडे मागणी केली होती. आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी वाशिंबे ग्रामस्थांची मागणी मान्य केल्याबद्दल वाशिंबे परिसरातील लोक सावंत कुटुंब यांच्या आभारी आहे
– प्रा. रामदास झोळ